सोन्याचे भाव ४२,००० पर्यंत जाणार?

आर्थिक मंदीमुळे गुंतवणूकदारांची पावले सोन्याकडे वळू लागली असून, सोन्याबरोबरच चांदीचे भावही वधारले आहेत. विश्लेषकांच्या मते सोन्याची चमक आणखी काही काळ तशीच राहण्याची शक्यता आहे. सध्या भारतासह जगभरात मंदीने आपले बस्तान बसविल्यामुळे...


आर्थिक मंदीमुळे गुंतवणूकदारांची पावले सोन्याकडे वळू लागली असून, सोन्याबरोबरच चांदीचे भावही वधारले आहेत. विश्लेषकांच्या मते सोन्याची चमक आणखी काही काळ तशीच राहण्याची शक्यता आहे. सध्या भारतासह जगभरात मंदीने आपले बस्तान बसविल्यामुळे शेअर बाजारांत घसरण होत असून, प्रॉपर्टी बाजारही थंड पडले आहेत. अशा प्रतिकूल परिस्थितीत सोन्यातील गुंतवणूक गुंतवणूकदारांना आकर्षक आणि सुरक्षित वाटू लागली आहे. चांदीतील गुंतवणुकीला घरघर सोन्यात गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांकडून चांदीच्या विक्रीवर भर देण्यात येत आहे. सोन्याच्या भावात आणखी वाढ होऊन दिवाळीपर्यंत हा धातू विक्रमी स्तरावर पोहोचण्याची शक्यता विश्लेषकांनी यापूर्वीच व्यक्त केली आहे. चालू वर्षात सोन्यातील गुंतवणुकीने २० टक्क्यांपेक्षा अधिक परतावा दिला आहे. २०१८मध्ये या धातूने जवळपास सहा टक्के परतावा दिला आहे. गेल्या वर्षी ३१ डिसेंबरला सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅमसाठी ३२,२७० रुपये होता. तो आज प्रति ग्रॅमसाठी ३९,००० रुपयांवर गेला आहे. चांदीचाही चांगला परतावा सोन्याप्रमाणेच यंदा चांदीलाही अच्छे दिन आले आहेत. गेल्या वर्षभराच्या कालावधीत चांदीचा भाव प्रति किलो ३९,००० रुपयांवरून ५०,००० रुपयांपर्यंत पोहोचला आहे. गुंतवणूकदारांच्या अपेक्षेपेक्षा अधिक परतावा देण्यात चांदी यशस्वी ठरली आहे. दिल्ली बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनचे अध्यक्ष विमल गोयल यांनी दिलेल्या माहितीनुसार जगभरातील मंदीच्या भीतीमुळे सोन्याच्या किमतीत वाढ झाली आहे. त्यांच्या मते देशांतर्गत अर्थव्यवस्थेतील सुस्तीव्यतिरिक्त अमेरिका, चीन यांच्यातील व्यापारयुद्धामुळेही सोने मजबूत होत आहे. या शिवाय डॉलरच्या तुलनेत रुपयाचे झालेले अवमूल्यन सोन्याच्या पथ्यावर पडत आहे. त्यामुळे सध्या गुंतवणुकीसाठी सोने-चांदीला पर्याय नसल्याचेही गोयल यांनी स्पष्ट केले. सोने ~४२,००० पर्यंत जाणार? गोयल यांच्या मते दिवाळीपर्यंत सोन्याचा प्रति दहा ग्रॅमसाठीचा भाव ४२,००० रुपये आणि चांदीचा प्रतिकिलो भाव ५२,००० रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. अखिल भारतीय सराफा संघाचे उपाध्यक्ष सुरेंद्र जैन यांच्या मते सोन्याच्या वाढत्या किमतीला रुपयाची घसरण हातभार लावत आहे. त्यातच पुन्हा देशांतर्गत मंदीचीही भर पडली आहे. चलनांतील घसरण कारणीभूत सध्या केवळ रुपयाच नव्हे, तर अन्य देशांची चलनेही डॉलरच्या तुलनेत घसरली आहेत. त्यामुळे सोन्याचे भाव वाढत आहेत. केंद्रीय अर्थसंकल्पाच्यानंतर शेअर बाजारातून विदेशी गुंतवणूकदारांनी आपली गुंतवणूक मागे घेण्यास सुरुवात केल्याने रुपयावरील दबाव वाढला आहे. सध्या डॉलरच्या तुलनेत रुपया ७२च्या पातळीवर गेला आहे. ऑल इंडिया जेम्स अँड ज्वेलरी ट्रेडर्स फेडरेशनचे माजी अध्यक्ष बच्छराज बमवाला यांच्या मते सोन्यातील तेजी देशांतर्गत आणि विदेशातील कारणांमुळे आहे. वाढत्या किमतीमुळे मागणीत घट बमवाला यांच्या मते चालू वर्षाच्या अखेरीस सोने प्रति दहा ग्रॅमसाठी ४१,५०० रुपयांच्या स्तरावर जाण्याची शक्यता आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण होत असल्याने सोन्यामधील तेजी वाढत आहे. सोन्याचे भाव वाढत असल्याचा नकारात्मक परिणाम सोन्याच्या विक्रीवर पडण्याची शक्यताही बमवाला यांनी व्यक्त केली. डॉलरच्या तुलनेत रुपया ७२च्या पातळीवर कायम राहत असेल, तर आंतरराष्ट्रीय बाजारात सोने प्रति औंस १५८०डॉलरवर जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर सोन्याचे भाव खाली येण्याचीही शक्यता आहे.


हवामान