ज्येष्ठ अभिनेते कादर खान यांचं निधन

ज्येष्ठ अभिनेते कादर खान यांचं निधन झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती प्रचंड खालावली होती. कॅनडातील रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ८१ वर्षांचे होते. कादर खान यांचा मुलगा सरफराज खान याने इंडियन एक्स्प्रेसशी...


ज्येष्ठ अभिनेते कादर खान यांचं निधन झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती प्रचंड खालावली होती. कॅनडातील रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ८१ वर्षांचे होते. कादर खान यांचा मुलगा सरफराज खान याने इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना या वृत्ताला दुजोरा दिला आहे. ‘हो माझ्या वडिलांचं आज सकाळी निधन झालं आहे. गेल्या काही महिन्यांपासून ते आजारी होते. काही दिवसांपासून रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. आम्ही सर्वोपतरी सर्व प्रयत्न केले, पण वेळ आली होती. जे कोणी त्यांच्या आयुष्यात आलं त्यांच्यावर ते प्रचंड प्रेम करायचे’, अशी प्रतिक्रिया सरफराज खान याने दिली आहे. कादर खान यांना श्वास घेताना त्रास होत असल्याने कॅनडातील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मिळालेल्या माहितीनुसार, कादर खान यांना वेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. कॅनडामध्येच कादर खान यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. कादर खान यांनी १९७३ मध्ये ‘दाग’ चित्रपटातून अभिनयात पदार्पण केलं. ३०० हून अधिक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं. नाटकापासून आपल्या करिअरची सुरुवात करणाऱ्या कादर खान यांनी अनेक चित्रपटांसाठी संवादलेखनदेखील केलं. २५० पेक्षा जास्त चित्रपटांचं संवाद लेखन त्यांनी केलं. त्यांची लेखणी आणि अभिनय वेगळंच रसायन होतं. त्यांनी लिहिलेल्या संवादातून समाजातील भीषण वास्तव मांडण्याचा ते प्रयत्न करत असत. आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचं दिलखुलास मनोरंजन करणारा एक उत्तम अभिनेता म्हणून कादर खान यांना ओळखलं जायचं. करिअरच्या सुरुवातीला व्हिलनचं पात्र साकारण्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या कादर खान यांनी हिंमतवाला चित्रपटापासून कॉमेडी भूमिकांकडे आपलं लक्ष्य केंद्रीत केलं होतं. कादर खान यांनी अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं. गोविंदासोबत त्यांची जोडी प्रेक्षकांना जास्त भावली. आँखे, मै खिलाडी तू अनाडी, जुदाई, खून भरी मांग, बिवी हो तो ऐसी, बोल राधा बोल, जुडवा अशा अनेक हिट चित्रपटांमध्ये त्यांचा अभिनय पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळाली. आपल्या ४५ वर्षांच्या करिअरमध्ये कादर खान यांनी दिग्दर्शक डेव्हिड धवन आणि गोविंदासोबत सर्वात जास्त काम केलं. १९९० चा काळ या तिघांनी अक्षरक्ष: गाजवला होता. साजन चले ससुराल, हिरो नंबर १, कुली नंबर १, दुल्हे राजा, हसीना मान जायेगी असे अनेक सुपरहिट चित्रपट तिघांनी केले.


हवामान