• 28 March 2024 (Thursday)
  • |
  • |


समुद्रातील मुंबईच्या विस्ताराला गती

पर्यावरणीय, समुद्र व भूभागाच्या अभ्यासाची जबाबदारी सल्लागारांवर ‘मेट्रो-३’ आणि सागरी किनारा मार्ग प्रकल्पात मोठय़ा प्रमाणावर निर्माण होणाऱ्या मातीची विल्हेवाट लावण्यासाठी कफ परेडमधील गीतानगर ते एनसीपीए परिसरालगत समुद्रात ३०० एकर...



पर्यावरणीय, समुद्र व भूभागाच्या अभ्यासाची जबाबदारी सल्लागारांवर ‘मेट्रो-३’ आणि सागरी किनारा मार्ग प्रकल्पात मोठय़ा प्रमाणावर निर्माण होणाऱ्या मातीची विल्हेवाट लावण्यासाठी कफ परेडमधील गीतानगर ते एनसीपीए परिसरालगत समुद्रात ३०० एकर जमीन निर्माण करून तेथे ‘ग्रीन पार्क’ उभारण्यात येणार आहे. भराव टाकून निर्माण करण्यात येणाऱ्या भूभागासाठी सर्वेक्षण करण्याचे कंत्राट पालिकेने एका संस्थेला दिले आहे. त्याच्या जोडीनेच या प्रकल्पामुळे पर्यावरण आणि भूभागावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करण्याची जबाबदारी अनुक्रमे गोव्यातील नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ ओशनोग्राफी (एनआयओ) आणि ‘नीरी’वर सोपविण्यात येणार आहे. मच्छीमार बांधवांचे पुनर्वसन, जेट्टी उभारणे, कांदळवनाचा अभ्यास आदी विविध कामांसाठी सल्लागार नियुक्त करण्याच्या हालचाली पालिकेत सुरू झाल्या आहेत. कुलाबा-वांद्रे-सीप्झ दरम्यान उभारण्यात येणारा ‘मेट्रो-३’ आणि नरिमन पॉइंट ते कांदिवली दरम्यान उभारण्यात येणाऱ्या सागरी किनारा मार्ग या दोन्ही प्रकल्पांमध्ये मोठय़ा प्रमाणावर टाकाऊ माती निर्माण होणार आहे. तसेच या प्रकल्पांच्या आड येणाऱ्या झाडींचीही कत्तल करावी लागणार आहे. वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचे संतुलन ढळण्याची शक्यता आहे. प्रकल्पांमध्ये निर्माण होणाऱ्या मातीची विल्हेवाट लावणे आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी समुद्रात निर्माण होणाऱ्या ३०० एकर भूखंडावर ‘ग्रीन पार्क’ उभारण्यात येणार आहे. त्यामुळे सध्याच्या मुंबईच्या ४३७.७१ चौरस कि.मी. क्षेत्रफळात ३०० एकराची भर पडणार आहे.कफ परेड येथे समुद्रात भराव टाकून भूभाग निर्माण करण्यासाठी सर्वेक्षण करण्याचा निर्णय पालिकेने घेतला असून या कामासाठी संस्थेची नियुक्ती करण्यात आली आहे. गीतानगर ते एनसीपीए दरम्यानच्या भागातील झोपडय़ा, किनाऱ्यालगत असलेले कांदळवन, समुद्राची खोली आणि खडकाळ भाग आदींचा अभ्यास करण्याची जबाबदारी या संस्थेवर सोपविण्यात आली आहे. या संस्थेला ४५ दिवसांमध्ये आपला अहवाल पालिकेला सादर करावा लागणार आहे. या कामाला दोन-तीन दिवसांमध्ये सुरुवात होत आहे. भराव टाकून भूभाग निर्माण करताना पर्यावरणावर कोणते परिणाम होऊ शकतात, समुद्राचा प्रवाह, खोली, जैवविविधता आदी सर्वच गोष्टींचा अभ्यास करावा लागणार आहे. या प्रकल्पामुळे होणाऱ्या पर्यावरणीय परिणामांचा अभ्यास करण्याची जबाबदारी गोवा येथील एनआयओ या संस्थेवर सोपविण्यात येणार आहे. समुद्राशी संबंधित अभ्यास करण्यासाठी किमान सहा महिने ते कमाल एक वर्ष कालावधी लागणार आहे. प्रत्येक मोसमात समुद्रात कोणते बदल होतात याचा अभ्यास करून अहवाल तयार करावा लागणार आहे. कफ परेड परिसरात समुद्रात भरणी केल्यानंतर सध्या अस्तित्वात असलेल्या भूभागावर कोणते परिणाम होऊ शकतात याचाही अभ्यास करावा लागणार आहे. हा अभ्यास करण्याचे काम ‘नीरी’वर सोपविण्यात येणार आहे. या दोन्ही कामांसाठी पालिकेला दोन ते तीन कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या दोन्हीचा अभ्यास पूर्ण होऊन अहवाल सादर करण्यात आल्यानंतर पर्यावरणविषयक परवानगी मिळविण्यासाठी संबंधित खात्यांशी पत्रव्यवहार करण्यात येईल, असे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले. कफ परेड परिसरातून मच्छीमारीसाठी समुद्रात जाणाऱ्या कोळी बांधवांच्या रोजगारावर ‘ग्रीन पार्क’मुळे गदा येऊ नये याची काळजी घ्यावी लागणार आहे. मच्छीमारीसाठी कोळी बांधवांना समुद्रात जाण्यासाठी स्वतंत्र मार्ग आखणे, त्यांच्यासाठी धक्का (जेट्टी) उभारणे, कांदळवनाचे संवर्धन करणे आदींचा विचार करावा लागणार आहे. या सर्व कामांसाठी स्वतंत्र सल्लागार नेमण्यात येणार आहे. या कामांसाठी अंदाजपत्रक तयार करणे, निविदा तयार करण्याचे काम सल्लागाराला करावे लागणार आहे. कफ परेडजवळील किनाऱ्यालगत भराव टाकून भूमी निर्माण करण्यात येणार आहे. ही भरावभूमी केवळ पर्यावरणाचा समतोल राखणारे ‘ग्रीन पार्क’ असेल. भूमी निर्माण करण्यासाठी समुद्रात सीमा आखावी लागणार आहे. त्यासाठी सल्लागाराची नियुक्ती करण्यात आली आहे. – अजोय मेहता, पालिका आयुक्त


महत्वाच्या बातम्या



हवामान