औरंगाबाद / पोलिसांनी तक्रारीची दखल घेतली असती तर वाचला असता भीमराज!

वैजापूर - आपल्या मुलीला पळवून नेल्याच्या संशयातून लाख खंडाळा येथील देविदास छगन देवकर, रोहिदास छगन देवकर या भावांनी एका दलित कुटुंबावर शनिवारी रात्री केलेल्या हल्ल्यात एका निरपराध युवकाचा जीव गेला. भीमराज बाळासाहेब गायकवाड (१७) या...


वैजापूर - आपल्या मुलीला पळवून नेल्याच्या संशयातून लाख खंडाळा येथील देविदास छगन देवकर, रोहिदास छगन देवकर या भावांनी एका दलित कुटुंबावर शनिवारी रात्री केलेल्या हल्ल्यात एका निरपराध युवकाचा जीव गेला. भीमराज बाळासाहेब गायकवाड (१७) या युवकाचे झोपेतच मुंडके छाटून सूड उगवण्यात आला. या हल्ल्यात भीमराजचे वडील बाळासाहेब आणि आई अलकाबाई या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, मृत युवकाच्या वडिलांनी १३ मार्च रोजी वैजापूर पोलिसांसह जिल्हा पोलिस अधीक्षक आणि उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांकडे तक्रार देऊन आपल्या जिवाला धोका असल्याचे कळवले होते. मात्र, पोलिसांनी या तक्रारीची दखलच घेतली नसल्याने एका निरपराधाचा बळी गेला. लाख खंडाळा येथील शेतवस्तीवर राहणारे बाळासाहेब गंगाधर गायकवाड यांचा मुलगा अमोल (२२) हा वैजापुरात केटरिंगचे काम करतो. तो १२ मार्च रोजी दुपारी अडीचच्या सुमारास घरच्यांना केटरिंगच्या कामावर जात असल्याचे सांगून घरातून बाहेर पडला. मात्र तो परतलाच नाही. त्याच दिवशी गायकवाड वस्तीच्या शेजारी असलेल्या देवकर वस्तीवरील देविदास देवकर यांची मुलगीही बेपत्ता झाली होती. अमोल यानेच तिला पळवल्याचा संशय देवकरला होता. याच संशयावरून शनिवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास देविदास देवकर आणि त्याचा लहान भाऊ रोहिदास देवकर हे गायकवाड यांच्या वस्तीवर आले. त्यांनी बाळासाहेब गायकवाड आणि पत्नी अलकाबाई यांना अमोलबाबत विचारणा करत त्यांच्यावर तलवार आणि कोयत्याने हल्ला चढवला. जिवाच्या अंकाताने गायकवाड दांपत्य भावकीतील गंगाधर गायकवाड यांच्या वस्तीकडे पळाले. त्याच वेळी या भावंडांनी घरात झोपलेल्या भीमराज गायकवाड याच्यावर हल्ला केला. झोपेतील भीमराज याची मान धडापासून वेगळी करून देवकर बंधू आपल्या वस्तीवर परतले. मृताचे नातेवाईक आक्रमक या घटनेमुळे गायकवाड यांच्या नातलगांसह आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते आक्रमक झाले होते. हल्ल्यापूर्वी आरोपींनी त्यांच्या घरातील सामान तालुक्यातील एका नातलगाच्या घरी रवाना करून हे हत्याकांड घडवून आणले. या कटात आरोपीची संख्या अधिक आहे. त्यांना त्वरित अटक करा, अशी भूमिका राजेंद्र बागूल, रिपाइंचे तालुकाध्यक्ष साहेबराव पडवळ, बसपाचे बाबासाहेब पगारे, शहराध्यक्ष बाळासाहेब त्रिभुवन यांनी घेतली होती. उपविभागीय पोलिस अधिकारी गोपाळ रांजणकर, पो. नि. अनंत कुलकर्णी, फौजदार अमोल ढाकणे, संजय घुगे यांनी दोषींवर कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर नातलगांनी मृतदेह ताब्यात घेतला. दोन आरोपींना रात्रीच अटक जखमी दांपत्याला वैजापुरातील रुग्णालयात दाखल केल्यानंतर रुग्णालयाने पोलिसांत एमएलसी नोंदवल्याने पोलिसांनी बाळासाहेब आणि अलकाबाई यांचे जबाब नोंदवले. त्यानंतर वैजापूर पोलिसांनी रविवारी पहाटे ३ ते ५ च्या दरम्यान देविदास आणि रोहिदास या दोन्ही हल्लेखोरांच्या मुसक्या आवळल्या. रविवारी सकाळी या दोघांवर खुनाच्या गुन्ह्यासह अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टनुसार गुन्हा नोंदवला. दांपत्याला रुग्णालयात हलवले : देवकर बंधूंच्या हल्ल्यात जखमी दांपत्याला दादासाहेब गायकवाड यांनी वैजापूर येथील रुग्णालयात हलवले. या दांपत्यावर वैजापूर येथे उपचार करून औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. काय केली होती तक्रार? बाळासाहेब गायकवाड यांनी पोलिस अधिकारी गोपाळ रांजणकर यांची शुक्रवारी सकाळी ११ वाजता भेट घेऊन तक्रार दिली होती. तक्रारीत त्यांचा मुलगा १२ मार्च रोजी दुपारी घरातून कामाला जातो असे सांगून गेला. रात्री परतलाच नाही. त्याच रात्री सागर देवकर याने आमच्या घरी येऊन तुमचा मुलगा कुठे आहे असे विचारून सकाळपर्यंत माझी बहीण व तुमच्या मुलाला घेऊन या नाही तर तुमच्या संपूर्ण कुंटुबाला मारुन टाकू, असे धमकावले. सदरील कुटुंब सधन असून ते काहीही करू शकतात. त्यांच्यापासून आमच्या कुटुंबास धोका निर्माण झाल्याचे म्हटले होते. बाळासाहेब यांच्यासोबत विश्वास बागूल व भीमराज हाही होता. अधिकारी रांजणकरांनी दिला उलटा सल्ला पोलिस अधिकारी गोपाळ रांजणकर यांच्याशी १३ मार्चला सकाळी १५ मिनिटे चर्चा झाली. रांजणकर यांनी या वेळी ‘तुमच्या लेकीबाळीसोबत असे घडले असते तर काय केले असते’, असा उलट सल्ला देत वैजापूर ठाण्यात तक्रार देण्यास सांगितले. मात्र त्यांनी तक्रारीची गंभीर दखल घेतली नाही, असा आरोप विश्वास बागूल यांनी केला. आमचा जीव वाचला, निष्पाप मुलाचा जीव गेला... आमच्या मोठा मुलगा अमोल याने शेजारच्या मुलीला पळल्याचा त्यांचा संशय आहे. मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार आम्ही वैजापूर ठाण्यात करून नातेवाइकाकडे मुलाचा ठावठिकाणा शोधण्याचा प्रयत्न करीत असतानाच शनिवारी बेपत्ता मुलीच्या बाप व चुलत्याने आमच्या झोपडीत घुसून आमच्यावर तलवार, कोयता अशा हत्याराने हल्ला चढवला. त्यांच्या तावडीतून आम्ही दोघे शेजारी राहणाऱ्या चुलत भावाच्या घराकडे पळाल्याने आम्ही बचावलो. पण घरात झोपलेला १७ वर्षे मुलाचा त्यांनी खून केला, असा जबाब मृत मुलाच्या आईने पोलिसांना दिला. तक्रार देऊनही दखल नाही अमोल आणि ती तरुणी १२ मार्चपासून बेपत्ता झाल्यानंतर त्याच दिवशी रात्री ८.३० वाजता देविदासचा मुलगा सागर याने आमच्या कुटुंबीयांना जिवंत मारण्याची धमकी दिल्याची तक्रार बाळासाहेबांनी १३ मार्च रोजी उपविभागीय पोलिस अधिकारी, वैजापूर ठाण्यात केली होती. पोलिसांनी दखल घेतली नाही. वैजापूर ठाण्यात हरवल्याची नोंद : वैजापूर पोलिस ठाण्यात ठाणे अंमलदार निकाळजे यांनी बाळासाहेब यांच्या तक्रारीवरून मुलगा हरवल्याची नोंद घेतली. मात्र त्यांनी सागर देवकरने दिलेल्या धमकीवर काहीच कारवाईची भूमिका नाही. शेवटी १४ मार्च रोजी रात्री भीमराजचे धड आणि मुंडके वेगळे करण्यात आले. भीमराजचा काय दोष..... प्रेम संबंधातून पळून गेलेल्या युवक, युवतीचा गुन्हा असताना माझा निष्पाप लहान नातू भीमराजचा बळी का घेतला? यात त्याचा काही सबंध नव्हता. १२ वीच्या परीक्षेचे पेपर देऊन मिळेल ते काम करून कुंटुबांला तो मदत करत असे. त्यामुळे निष्पापाचा खून का केला, असा सवाल मृताचे वयोवृद्ध आजोबा विचारत होते. या प्रकरणात आरोपीची संख्या अधिक असल्याचा संशयही त्यांनी व्यक्त केला. तणाव निवळण्यासाठी दुपारीच अंत्यसंस्कार मृत तरुणावर रविवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. या घाटनेची माहिती गावासह परिसरात पसरल्यानंतर तणाव निर्माण झाला. त्यामुळे पोलिसांनी दुपारीच अंत्यसंस्कार उरकण्याचा सल्ला दिल्याने दुपारीच अंत्यसंस्कार केले गेले.

हवामान