राज्यात कोरोनाः महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांचा आकडा ४२ वर, सर्वच रुग्णांची प्रकृती स्थिर -आरोग्य मंत्री

मुंबई - राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा आता ४२ वर पोहोचला आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. त्यांनी सांगितल्याप्रमाणे, सर्वच रुग्णांची प्रकृती सध्या स्थिर आहे. आतापर्यंत ८०० संशयित रुहग्णांची...


मुंबई - राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा आता ४२ वर पोहोचला आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. त्यांनी सांगितल्याप्रमाणे, सर्वच रुग्णांची प्रकृती सध्या स्थिर आहे. आतापर्यंत ८०० संशयित रुहग्णांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ४२ जणांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. परदेशातून येणाऱ्या नागरिकांवर खास लक्ष ठेवले जात आहे. सोबतच, पुण्यातील एनआयव्हीला तातडीने भेट देऊन टोपे तेथील अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. नवीन लॅबचे व्हॅलिडेशन करण्याचे महत्वाचे काम एनआयव्हीचे आहे. परंतु, कुठल्याही माध्यमाला तेथे आत जाण्याची परवानगी नसेल असेही आरोग्य मंत्र्यांनी सांगितले आहे. संशयितांशी दुजाभाव करू नका, आरोग्य मंत्र्यांचे आवाहन आरोग्य मंत्री राजेश टोपे पत्रकारांशी संवाद साधताना पुढे म्हणाले, काही ठिकाणी संशयित रुग्णांसोबत शेजारी आणि इतरांकडून दुजाभाव केला जात आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे, पुण्यात इतर देशातून आपल्या घरी परतणाऱ्या स्थानिकांना त्यांच्याच घरात जाण्यापासून शेजाऱ्यांनी रोखल्याचे प्रकार घडले आहेत. त्यावर टोपे बोलत होते. कृपया, कुणीही कोरोना रुग्णाशी भेदभाव करू नये. हा आजार बरा होणारा आहे. त्यामुळे, घाबरू नये असे आवाहन आरोग्य मंत्र्यांनी केले आहे. ...तर लोकल बंद करावी लागेल -आरोग्य मंत्री कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. त्यातील सर्वात महत्वाचा उपाय म्हणजे, गर्दी कमी करणे हा आहे. अशात लोकांनी विनाकारण गर्दी करू नये. आवश्यक नसेल तर प्रवास टाळावा. कंपन्या आणि संस्थांनी आपल्या कर्मचाऱ्यांना कृपया वर्क फ्रॉम होमची परवानगी द्यावी. जेणेकरून लोकल आणि इतर ठिकाणी गर्दी कमी होईल. सरकारी कार्यालयांमध्ये बंद ठेवण्यात आला नसला तरीही किमान कर्मचाऱ्यांमध्ये काम कसे करता येईल, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे, लोकांनी स्वयंशिस्तीने गर्दी टाळावी. विनाकारण गर्दी होत राहिल्यास आणि लोकांनी सरकारला सहकार्य न केल्यास लोकल आणि इतर सार्वजनिक प्रवास सेवा बंद करण्याचा विचारही करावा लागू शकतो असे राजेश टोपे यांनी सांगितले आहे.

हवामान