अक्षय्य तृतीयेला जवळ येत आहे.
हिंदूंसाठी हा एक शुभ आणि पवित्र दिवस आहे. यावर्षी 22 एप्रिल 2023 रोजी अक्षय्य तृतीया साजरी होणार आहे. अक्षय या शब्दाचा अर्थ ‘कधीही कमी न होणारा’ असा होतो. त्यामुळे या दिवशी सोने खरेदी केल्याने पैशाची कमतरता भासत नाही, असे मानले जाते. 1 एप्रिलपासून सरकारने सोन्याचे नियम बदलले होते. बनावट सोने खरेदी टाळण्यासाठी तुम्हाला या नियमांची माहिती असणे आवश्यक आहे. अन्यथा एक चूक तुम्हाला महागात पडू शकते.
सोन्याचे नवीन नियम : ब्यूरो ऑफ इंडिया स्टँडर्ड ने 1 एप्रिलपासून सर्व सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्किंग अनिवार्य केलेय. 1 एप्रिलपासून सोन्याचे दागिने 6 अंकी युनिक अल्फान्यूमेरिक हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन नंबर शिवाय विकता येणार नाहीत.
HUID क्रमांकाद्वारे दागिन्यांची शुद्धता तपासली जाऊ शकते. याच्या मदतीने सोने शुद्ध आहे की नाही हे ग्राहकांना कळू शकते. कोणत्याही दुकानदाराने हॉलमार्कशिवाय दागिने विकण्याचा प्रयत्न केल्यास त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल. या नियमाचे उल्लंघन केल्यास दंडही होऊ शकतो. यामुळे तुम्ही दागिने घेताना सतर्क राहणं गरजेचं आहे.
सोन्याची शुद्धता कशी तपासावी: कोणत्याही सोन्याच्या दागिन्यावर BIS लोगो असेल तर ते शुद्ध मानले जाते. या लोगोद्वारे ग्राहक कोणत्याही सोन्या-चांदीच्या दागिन्यांची शुद्धता ओळखू शकतात. दागिन्यांवर असलेल्या Fineness Number आणि कॅरेटवरूनही शुद्ध सोने ओळखता येते.
यावर्षी अक्षय्य तृतीया कधी आहे? : दरवर्षी वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला अक्षय्य तृतीया असे म्हणतात. असे मानले जाते की अक्षय्य तृतीयेच्या दिवशी एखाद्याने नवीन काम सुरू केले तर त्याला आशीर्वाद मिळतो. यामुळेच आजच्या दिवशी सोनं खरेदी करणं शुभ मानलं जातं.