• 7 August 2022 (Sunday)
  • |
  • |


सभेची सुरवात औरंगजेबाच्या कबरीवर फुले वाहून करणार का? रवी राणा यांचा मुख्यमंत्र्यांना सवाल


संभाजीनगर येथील औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन फुले वाहतात त्यांच्यावर कारवाई का होत नाही ?
एकीकडे धार्मिक स्थळावरील भोंग्याचे राजकारण तापलेले असताना, काल राजकारण आणखी तापवण्यासारखी घटना घडली आहे. आपल्या प्रक्षोभक भाषणाने प्रसिद्ध असणारे अकबरुद्दीन ओवैसी हे गुरुवारी औरंगाबादेत आले आणि त्यांनी औरंगजेबाच्या कबरीला भेट दिली आणि कबरीचे दर्शन घेतले. त्यामुळे पुन्हा एका नव्या वादाला तोंड फुटले आहे. या प्रकरणानंतर विरोधी पक्ष असणाऱ्या भाजपासहीतच सत्ताधारी शिवसेनेनंही ओवेसी यांच्यावर टीका केली आहे. अशातच आता अमरावतीचे अपक्ष आमदार रवी राणा यांनी या प्रकरणावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. आमदार रवी राणा सध्या दिल्लीत आहेत. दिल्लीमधून या प्रकरणासंदर्भात त्यांनी एका व्हिडिओद्वारे आपली प्रतिक्रिया मांडत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधा आहे. “छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र, संभाजी राजेंच्या विचारांचा महाराष्ट्र, ज्या महाराष्ट्रात संभाजी नगर येऊन ओवेसी फुलं वाहतात. माझ्या राजकीय जीवनामध्ये आतापर्यंत ती कबर कोणी उघडली, तिथं फुलं वाहिली हे मी फक्त उद्धव ठाकरे सरकारच्या काळात पाहिलेलं आहे,” असं रवी राणा म्हणालेत. पुढे बोलताना त्यांनी स्वत:वर आणि त्यांच्या खासदार पत्नी नवनीत राणा यांच्याविरोधात राज्य सरकारने हनुमान चालिसा प्रकरणी दाखल केलेल्या गुन्ह्याची आठवण करुन दिली. "हनुमान चालीसा पठण केल्याने आम्हाला तुरूंगात टाकले जाते पण ओवेसी महाराष्ट्रातील संभाजीनगर येथील औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन फुले वाहतात त्यांच्यावर कारवाई होत नाही. आता देशातील प्रत्येक हिंदूचा उद्धव ठाकरेंना सवाल आहे की, तुम्ही खरे हिंदूंचा असाल तर उद्याच्या सभेची (शनिवार १४ मे) सुरुवात उद्धव ठाकरे हनुमान चालीसा वाचून करणार? की औरंगजेबाच्या कबरीवर फुले वाहून करणार" ? असा थेट सवाल आमदार रवी राणा यांनी केला आहे.


महत्वाच्या बातम्याहवामान