ठाणे/ बी.डी.गायकवाड :– तालुका स्तरावरील विभाग निहाय कामकाजची माहिती घेऊन मार्गदर्शन करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी छायादेवी शिसोदे यांनी पंचायत समिती कल्याण येथे भेट देऊन विविध कामांचा आज (दि. १२ जून २०२४) आढावा घेतला. याप्रसंगी सर्व अधिकारी यांचे पंचायत समिती कल्याण मार्फत गटविकास अधिकारी पल्लवी सस्ते यांनी स्वागत केले.
दत्तक पालक योजना संपुर्ण जिल्ह्यात राबविण्यात आली असून सर्व विभाग प्रमुख यांनी बालकांच्या घरी भेट देऊन बालकांचे आरोग्य सृदृढ होण्यासाठी प्रयत्नशील राहण्याच्या सूचना यावेळी महिला व बाल विकास विभाग प्रमुख संजय बागुल यांनी उपस्थित अधिकारी यांना दिले. तालुक्यातील एकूण ९ सॅम कुपोषित बालकांची संख्या कमी करण्यासाठी बालकांना दिला जाणारा आहार, गृहभेट व आरोग्य तपासणी वेळोवेळी करण्यासाठी सुचना देण्यात आल्या आणि ग्रामसेवक यांनी प्रत्यक्ष अंगणवाडी भेट देऊन अंगणवाडीतील बालकांची काळजी स्वतःच्या घरातील मुलाप्रमाणे ग्रामपंचायतीतील बालकांना सांभाळा अशा सूचना यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिले.
अंगणवाडी बांधकाम, धोकादायक इमारती, विद्यार्थी संख्या वाढण्यासाठी नियोजन, स्मार्ट अंगणवाडी, बालकांना दिला जाणारा आहार याविषयी देखील महिला व बालविकास विभाग निहाय सर्व विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. ऑनलाईन पद्धतीने सर्व नियंत्रण अंगणवाडी कामकाजावर ठेवण्यात आले आहे तरी सर्व अंगणवाडी सेविका यांनी कामकाज सुरळीत सुरू राहिल यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन यावेळी संजय बागुल यांनी केले.
कल्याण तालुक्यात अंगणवाडी केंद्रावर जल जीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा व्हावा यासाठी सर्वांनी दक्षता घ्यावी तसेच ज्या अंगणवाडी केंद्रावर पाणी पुरवठा होत नाही अशा अंगणवाडी केंद्रावर नळाद्वारे पाणी पुरवठा होईल याची काळजी घ्यावी व अंगणवाडी केंद्रातील सर्व बालकांचे आरोग्य यंत्रणेने मार्फत आरोग्य तपासणी करावी अशा सूचना दिल्या.
समाज कल्याण विभाग अंतर्गत दिव्यांग लाभार्थ्यांचे सर्व्हेक्षण सुरू असून विविध योजना राबविण्यासाठी भविष्यात मदत होणार आहे. दिव्यांग लाभार्थ्यांची माहिती अंगणवाडी सेविका यांच्याद्वारे ऑनलाईन पद्धतीने वेळेत भरण्यात यावा असे आवाहन उपस्थित मुख्य सेविका यांना करण्यात आले.
बोगस बियाणे, तांत्रिक तुटवडा अशा विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली असून तालुक्यात बियाणांच्या तक्रारींकडे ग्रामसेवक यांनी लक्ष द्यावे अशा सुचना कृषी विकास अधिकारी रामेश्वर पाचे यांनी दिली. बांबू लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांचे बैठक घेऊन शेतकऱ्यांना योग्य माहिती द्यावी व कल्याण तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रस्ताव जास्तीत जास्त यावे असे आदेश दिले.
जनसुविधा अंतर्गत सुरू असलेल्या कामांचा ग्रामपंचायत निहाय आढावा घेण्यात आला. माझी वसुंधरा अतंर्गत सर्व ग्रामपंचायतींमधील कामाची माहिती घेण्यात आली. मनरेगा अंतर्गत वृक्षलागवड करण्यात येणाऱ्या नियोजन संदर्भात चर्चा करण्यात आली. प्रत्येकी ग्रामपंचायत निहाय २०० वृक्षलागवड पुढील सात दिवसात करण्यासाठी सुचना देण्यात आल्या.
जल जीवन मिशन कामासंदर्भात ग्रामसेवकांच्या समस्या जाणून घेतल्या व त्यांना अपूर्ण काम निहाय योग्य मार्गदर्शन यावेळी करण्यात आले. तालुक्यात १५ पाण्याच्या टाकीचे काम अपूर्ण असल्याने संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सुचना यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी छायादेवी शिसोदे यांनी दिले. काकड पाडा गावातील पाणीपुरवठा नळाद्वारे होत नसल्याने तेथील समस्या लवकरात लवकर सोडवण्यासाठी उपाययोजनांची कार्यकारी अभियंता प्रदीप कुलकर्णी यांनी माहिती दिली. हातपंप संदर्भातील ग्रामपंचायत निहाय थकबाकी संदर्भात आढावा घेतला गेला. पाणीपट्टी वसुली कल्याण येथील कमी असल्याने थकबाकी रक्कम ग्रामपंचायत निहाय भरण्यात यावे अशा सुचना देण्यात आल्या.
लघुपाटबंधारे विभागातील एकूण ७ काम सुरू असलेल्या काम निहाय आढावा घेतला गेला. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत हायवेलगत उचलण्यात आलेल्या कचऱ्याचे व्यवस्थापन योग्य ठिकाणी करण्यात यावे अशा सुचना ग्रामसेवकांना देण्यात आल्या. ओला कचरा व सुका कचरा वेगवेगळा करून ग्रामपंचायतीने कचऱ्याचे व्यवस्थापन करावे. कचरा टाकणाऱ्या व्यक्ती व खाजगी कंपन्या किंवा हॉटेलद्वारे कचरा हायवे लगत टाकल्यास कारवाई करण्याचे आदेश दिले गेले.
१५ जून रोजी शाळा प्रवेश उत्सव जिल्हा परिषद मार्फत राबविण्यात येत असून या उपक्रमांची तयारी करण्यात आली आहे तसेच १५ जून रोजी कल्याण तालुक्यात सर्व शाळेत पाठ्यपुस्तक वितरण करण्यात येणार असल्यासंदर्भातील माहिती गटशिक्षणाधिकारी यांनी उपस्थित सर्वांना दिली.
तालुक्यात दुषित पाणी नमुने तपासावे. पावसाळ्यात माहेर घर योजना राबविण्यात येणार आहे याद्वारे गरोदर मातांची काळजी घेतली जाणार आहे. तालुक्यातील जन्म मृत्यू नोंदी ऑनलाईन पध्दतीने ग्रामसेवक यांनी करावी. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रावर देखील यांची ऑनलाईन नोंद व्हावी.
प्रधानमंत्री घरकुल आवास योजना अंतर्गत मंजूर घरकुल ३६४ त्यापैकी ३४७ पुर्ण झाली असून प्रगतीपथावर १७ घरकुल आहे ती लवकर पुर्ण करण्याच्या सुचना यावेळी देण्यात आल्या. तसेच इतर योजनांचे सविस्तर आढावा यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी घेतला.
सामान्य प्रशासन विभाग अंतर्गत पेंशन प्रकरण, आयुक्त तपासणी मुद्दे, गोपनीय अहवाल संदर्भातील सविस्तर आढावा उप मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे यांनी यावेळी घेतला.
यावेळी उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र) अविनाश फडतरे, उप मुख्य कार्यकारी ग्रामपंचायत विभाग प्रमुख प्रमोद काळे, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग प्रदिप कुलकर्णी, कार्यकारी अभियंता संदिप चव्हाण, प्रकल्प संचालक पाणी व स्वच्छता विभाग अतुल पारसकर, महिला व बालविकास विभाग प्रमुख संजय बागुल, कृषी विकास अधिकारी रामेश्वर पाचे, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. स्वाती पाटील, गटविकास अधिकारी पंचायत समिती कल्याण पल्लवी सस्ते, उपअभियंता विकास जाधव, कार्यकारी अभियंता समग्र शिक्षा युवराज कदम, विस्तार अधिकारी सांख्यिकी संतोष पांडे, इतर सर्व तालुका स्तरावरील विभाग प्रमुख, मुख्य सेविका, ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक तसेच अधिकारी व कर्मचारी आढावा बैठकीत उपस्थित होते.