छत्रपती संभाजीनगर दि.१४(जिमाका)- महाराष्ट्र इन्स्टिट्युशन फॉर ट्रान्स्फॉर्मेशन ‘मित्र’च्या वतीने बुधवार दि. १९ रोजी विकास परिषदेचे आयोजन एमआयटी संस्थेत करण्यात आले आहे. जिल्हा विकास आराखड्यानुसार पाच वर्षाच्या कृती कार्यक्रमानुसार महत्त्वाच्या पाच क्षेत्रातील तज्ज्ञ साधन व्यक्ति विचारमंथन करुन जिल्ह्याच्या विकासाची ‘ब्लू प्रिंट’ तयार करतील. राज्यातली ही पहिलीच परिषद छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात होत आहे.
येथील जिल्हा नियोजन सभागृहात आज या विकास परिषदेच्या आयोजनासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीस ‘मित्र’चे सह. मुख्य कार्यकारी अधिकारी सुशिल खोडवेकर, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, सह संचालक डॉ. प्रमोद शिंदे, उपायुक्त नियोजन तथा मराठवाडा विकास मंडळाचे सदस्य सचिव डॉ. किरण गिरगावकर, एमआयटी संस्थेचे संचालक मुनिश शर्मा, महाराष्ट्र आर्थिक विकास परिषदेचे आशिष गद्रे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक स्वप्निल राठोड, डॉ. अरुण औटी आदी उपस्थित होते.
बैठकीत दि.१९ रोजी होणाऱ्या विकास परिषदेत करावयाच्या चर्चा, त्यात सहभागी होणारे तज्ज्ञ व्यक्ति, विषयपत्रिका इ. च्या अनुषंगाने चर्चा करण्यात आली. प्रारंभी प्रा.डॉ. एस. मुजूमदार यांनी जिल्ह्याच्या पाच वर्षाचा कृती विकास आराखड्याचे सादरीकरण केले.
जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगितले की, जिल्ह्याला विकास परिषदेच्या आयोजनाची संधी मिळत आहे. त्यात आगामी पाच वर्षात क्षेत्रनिहाय विकासाच्या नियोजनाबाबत चर्चा होणार आहे. या संधीचे सोने करत प्राधान्य क्षेत्रातील तज्ज्ञांना ह्या परिषदेत सहभागी करुन घेत जिल्ह्याच्या विकासाचा उत्तम आराखडा तयार करण्यात येईल.
‘मित्र’ चे सह मुख्य कार्यकारी अधिकारी खोडवेकर म्हणाले की, प्रथमच अशी विकास परिषद छत्रपती संभाजीनगर येथे होत आहे. यानंतर या परिषदा राज्यभरात होतील. मराठवाडा वॉटरग्रीड, कृषी, उद्योग, पर्यटन, माहिती तंत्रज्ञान अशा महत्त्वाच्या क्षेत्रांच्या विकासाबाबत तसेच त्यातून आर्थिक विकास, रोजगार निर्मिती व अर्थव्यवस्था बळकटीकरणाच्या उपाययोजना समोर येतील. त्याचे दस्ताऐवजीकरण करुन ते शासनाकडे सोपविण्यात येईल. त्यातील शिफारसींनुसार विकास प्रक्रिया निर्वेध करण्यासाठी शासनस्तरावर उपाययोजना करण्यात येतील. पाचही क्षेत्रातील निवडक तज्ज्ञ ५० साधन व्यक्ति सहभागी होऊन क्षेत्रनिहाय चर्चा, विचारमंथन करतील. या कार्यक्रमाची सविस्तर रुपरेषा लवकरच कळविण्यात येईल,असेही त्यांनी सांगितले.
बैठकीचे सूत्रसंचालन जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ यांनी केले.