समाजात कुठेही दरी निर्माण होता कामा नये, ही सरकारची भूमिका आहे. आपल्याला टिकणारे आरक्षण द्यायचे आहे. त्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि मंत्री मंडळ याबाबत सकारात्मक आहेत. दोन्ही समाजातील नेत्यांनी दरी निर्माण होणार नाही याची काळजी घ्यायला हवी. आपल्या बोलण्यातून तेढ निर्माण होता काम नये याची काळजी सर्वांनी घ्यावी. हे माझे सर्वांना सांगणे आहे. तसेच आमच्या राजकीय नेत्यांनी एकमताने तोडगा काढला पाहिजे. निव्वळ राजकीय पोळी भाजण्याचा कुणीही प्रयत्न करू नये. मतांसाठी हे दुभाजन कोणीही करू नये. असे आवाहन भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी केले आहे.
ओबीसी आणि मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्याचे सामाजिक आणि राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. अशातच जालन्यातली वडीगोद्री येथे लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांचे प्राणांतिक उपोषण सुरु आहे. आज त्यांच्या उपोषणाचा दहावा दिवस आहे. शुक्रवारी मुंबईत पार पडलेल्या बैठकीनंतर आणखी एक सरकारी शिष्टमंडळ लक्ष्मण हाके यांना येऊन भेटणार आहे. मात्र, त्यापूर्वीच येत्या अधिवेशनाच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशीच मराठा आणि ओबीसी समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सर्व पक्षीय नेत्यांची बैठक घेऊन या वर तोडगा काढला जाईल. असे आश्वासन भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी दिले आहे.
काल, शुक्रवारी जालना आणि पुण्याला आम्ही गेलो होतो. यावेळी वाघमारे आणि लक्ष्मण हाके यांचे मी काल मुख्यमंत्री आणि उपमख्यमंत्र्यांशी बोलणे करून दिले. तसेच काल जालना आणि पुण्याचे शिष्टमंडळ देखील सोबत होते. येत्या अधिवेशनात आम्ही बैठक घेणार आहोत आणि या संदर्भात ठोस पाऊल उचलत टिकणारे आणि समाजाचे समाधान होईल असेच आरक्षण देण्याची आमची भूमिका आहे. त्यामुळे कुठेही समाजात दरी निर्माण होता कामा नये ही देखील सरकारची भूमिका असल्याचेही गिरीश महाजन म्हणाले.