नीट यूजी परीक्षेतील घोटाळ्याचे महाराष्ट्रातील धागेदोरे उघड झाल्यानंतर आता 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी ताब्यात घेतलेल्या लातुरातील दोन शिक्षकांना चौकशीनंतर रात्री उशिरा सोडून देण्यात आले होते. मात्र, त्यांच्या सुटकेला 12 तासही उलटत नाहीत तोच रविवारी पुन्हा एक शिक्षकाला अटक करण्यात आली. नीटमध्ये गुण अधिकचे मिळवून देण्यासाठी लातूरचे दोन जण काम करत असल्याचे एटीएसच्या प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या दोन शिक्षकांसह धाराशिव आणि दिल्ली येथील एक जण अशा चौघांविरोधात लातूरच्या शिवाजीनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लातूरहून पैसे धाराशिवला नंतर दिल्लीला पाठवण्यात येत होते.
लातूर येथील संजय तुकाराम जाधव (४०, जि. प. प्राथमिक शाळा, टाकळी, ता. माढा) आणि जलिलखान उमरखान पठाण (३४, मुख्याध्यापक, जि. प. प्राथमिक शाळा, कातपूर, ना. जि. लातूर) हे दोघे नीट परीक्षेत गैरव्यवहार करत उमेदवारांना परीक्षा पास करून देण्याचे रॅकेट चालवत असल्याची माहितीवरून नांदेडच्या दहशतवाद विरोधी पथकाचे पथकाने लातुरातून जाधव आणि पठाण यांना शनिवारी ताब्यात घेऊन त्यांची रात्री उशिरापर्यंत चौकशी करून सोडून दिले होते. पठाणला रात्री अटक झाली आहे.
एटीएसने त्यांचे मोबाइल तपासले असता धक्कादायक माहिती समोर आली. त्यांच्या फोन गँलरीमध्ये 12 वर विद्यार्थ्यांच्या परीक्षा प्रवेशपत्रांच्या प्रती आढळल्या. या सोबतच परीक्षा व उमेदवारांसंदर्भात अनेक व्हॉटस्ऍपचॅट आढळले. जलिलखान पठाण याने संजय जाधव पास काही प्रवेशपत्रांच्या प्रती आणि आर्थिक व्यवहारासंदर्भात व्हॉट्सअप मेसेज पाठवल्याचे दिसून आले.
संशयित संजय जाधव याने पैशांच्या मोबदल्यात परीक्षा पास करण्याचे आश्वासन देऊन अनेक विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे इरन्ना मष्णाजी कोनगलवार (नेमणूक औद्योगिक प्रशिक्षण संस्था, उमरगा, जि. धाराशिव) यास व्हॉट्सअॅपद्वारे पाठवल्याचे कबूल केले. संजय जाधव याच्या माहितीनुसार, इरन्ना कोनगलवार हा पुढे दिल्ली येथील एका गंगाधर नावाच्या व्यक्तीच्या संपर्कात आला. त्याच्या माध्यमातून नीट-२०२४ परीक्षेमध्ये पैशाचे मोबदल्यात प्रवेश मिळून देण्याचे अवैध काम करीत आहे. प्राथमिक चौकशीत दोषी आढळताच दहशतवाद विरोधी पथकाच्या वतीने लातुरातील दोन शिक्षकांसह चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.













