काही दिवसांपूर्वी मुंबईतील घाटकोपरमध्ये पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळल्याची घटना घडली होती. या घटनेत १७ नागरिकांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, याप्रकरणी आता मोठी कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी आता राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक कैसर खालिद यांना निलंबित करण्यात आलं आहे. प्रशासकीय कामात गलथानपणा केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे
महाराष्ट्र सरकारने यासंदर्भातील परिपत्रत जारी केले आहे. या परिपत्रकात कैसर खालिद यांना पुढील आदेशापर्यंत तत्काळ प्रभावाने निलंबित करण्यात येत असल्याचे म्हटलं आहे. तसेच जोपर्यंत हे निर्देश लागू आहेत, तोपर्यंत त्यांना निर्वाह भत्ता, महागाई भत्ता आणि देय असलेले इतर भत्ते अदा केले जातील, असंही या परिपत्रकात नमूद करण्यात आलं आहे.
या परिपत्रकानुसार, कैसर खालिद यांनी निकषांकडे दुर्लक्ष करत हे होर्डिंग्ज उभारण्याची परवानगी दिली, असा आरोप करण्यात आला आहे. तसेच त्यांनी आपल्या अधिकारांचा गैरवापर करत पोलीस महासंचालक कार्यालयाची परवानगी न घेता स्वतःहून होर्डिंग मंजूर केले, असेही या परिपत्रकात नमूद करण्यात आलं आहे.