गेल्या काही दिवसांपासून दूध उत्पादक शेतकरी राज्य सरकारच्या विरोधात निदर्शने करत आहेत. दुधाच्या बाजारभावामध्ये वाढ करून 40 रु प्रति लिटर इतके करावे. अशी मागणी दूध उत्पादक शेतकरी करत आहेत. परंतु राज्य सरकार या मागणीला गांभीर्याने घेत नाही असं शेतकऱ्यांचे म्हणणं आहे. याच पार्श्वभूमीवर ‘किसान सभा’ आजपासून (28 जून) राज्य व्यापी आंदोलन करणार आहे. किसान सभेचे नेते डॉ. अजित नवले यांच्या नेतृत्वात हे आंदोलन होणार आहे.
गेल्या वर्षभरापासून दूध दराबाबत शेतकऱ्यांच्या मनात प्रचंड नाराजी आहे. शेतकऱ्यांना प्रति लिटर १० ते १५ रुपयांचा तोटा सहन करून दूध दुधाची विक्री करावी लागत आहे. आधीच दुग्ध जनावरांच्या वाढलेल्या किंमती, त्यांच्या संगोपनासाठी लागणारा खर्च पाहता दूध उत्पादक शेतकरी तोट्यात आहे.
राज्य सरकारने ही दूध उत्पादक शेतकऱ्यांची परिस्थिती लक्षात घेऊन नागपूर अधिवेशनात जाहीर केल्याप्रमाणे दुधाला किमान ३५ रुपये दर द्यावा, त्याचबरोबर बंद केलेले दूध अनुदान पुन्हा सुरू करावे. शेतकऱ्यांचा वाढता उत्पादनखर्च व तोटा पाहता दुधाच्या अनुदानात वाढ करून ते प्रति लिटर १० रुपये इतके करण्यात यावे. अनुदान बंद असताना ज्या शेतकऱ्यांनी दुधाची विक्री केली अशा शेतकऱ्यांना त्या काळातील अनुदान देण्यात यावं अशी मागणी करण्यात आली आहे .
आजपासून सुरू होणाऱ्या आंदोलनाकडे सरकारने दखल घ्यावी. दूध उत्पादक शेतकऱ्यांचा अंत पाहू नये असा इशारा शेतकरी संघटनांनी राज्य सरकारला दिला आहे. दुधाचा प्रश्न कायम स्वरूपी मिटवण्यासाठी सरकारने दीर्घकालीन टिकेल असं दूध धोरण तयार करावं. तसेच दुग्ध मूल्य आयोगाची स्थापना करण्यात यावी. अशी मागणी देखील करण्यात आली आहे. त्यामुळे राज्य सरकार दूध दर वाढीबद्दल काय भूमिका नेमकी काय भूमिका घेतंय? याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.