राज्याच्या राजकारणातील आताच्या घडीची मोठी बातमी… विधानपरिषदेसाठी भाजपने 10 नावं निश्चित केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ही यादी केंद्राकडे पाठवली असल्याची देखील माहिती आहे. अमित गोरखे, परिणय फुके, सुधाकर कोहळे या नेत्यांच्या नावाचा भाजपच्या विधान परिषदेच्या यादीत समावेश आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. या यादीत दोन महिला नेत्यांच्या नावाचा समावेश आहे. पंकजा मुंडे आणि चित्रा वाघ या दोन महिला नेत्यांच्या नावाचा या यादीत समावेश आहे. लोकसभा निवडणुकीनंतर विधानपरिषदेच्या जागांसाठी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी भाजपने 10 नावं निश्चित केली असल्याची माहिती आहे.
भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडे यंदा लोकसभेच्या रिंगणात होत्या. बीड लोकसभा मतदारसंघात भाजपकडून त्यांनी निवडणूक लढवली. या निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे बजरंग सोनवणे यांचा विजय झाला. तर पंकजा मुंडे यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. त्यामुळे आता पंकजा मुंडे यांचं राजकीय पुनर्वसन होणार का?, अशी राजकीय वर्तुळात चर्चा होत होती. अशातच विधान परिषदेच्या उमेदवारांच्या यादीत पंकजा मुंडे यांच्या नावाचा समावेश आहे. त्यामुळे पंकजा मुंडे यांचं हे राजकीय पुनर्वसन असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.