शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संघटनेचे अध्यक्ष संभाजी भिडे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. मनोहर भिडे उर्फ संभाजी भिडे हे संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्यांचं पुण्यात आगमन होताना त्या धारकऱ्यांसह या सोहळ्यात सहभागी झाले होते. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं.
“आपल्याला १५ ऑगस्टला मिळालेलं स्वातंत्र्य दळभद्री आणि हणगं स्वातंत्र्य आहे. ते जमत नाही. स्वातंत्र्य म्हणजे हिंदवी स्वातंत्र्य. भगवा झेंडा घेऊन आपण स्वातंत्र्य दिन साजरा केला पाहिजे. जिथे जिथे सूर्य उगवतो तिथे तिथे भगवा झेंडा घेऊन हिंदवी स्वराज्य स्वातंत्र्य दिन साजरा करायचा आहे.” असं वक्तव्य संभाजी भिडेंनी केलं. आता यावरुन आता वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
संत ज्ञानेश्वर महाराज तसंच संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यात वारकऱ्यांबरोबर धारकरी पालखीत सहभागी होतात. याआधी पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावर झालेल्या कार्यक्रमात संभाजी भिडेंनी देशाच्या स्वातंत्र्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं. यावेळी शिवप्रतिष्ठान अध्यक्ष संभाजी भिडे यांना आषाढी वारीत सहभागी होण्यावर निर्बंध नसले, तरी त्यांना पुणे पोलिसांनी वारीत सहभागी होण्यापूर्वी नोटीस दिली आहे. पालखी दर्शनावेळी कायदा-सुव्यवस्थेची काळजी घ्यावी, अशी सूचना भिडे यांना देण्यात आली.
संभाजी भिडे सांगलीत राहतात. त्यांचं वय ८५ वर्षांहून अधिक आहे. त्यांचं मूळ नाव मनोहर भिडे हे आहे. तर सातारा जिल्ह्यातील सबनीसवाडी हे त्यांचं मूळ गाव आहे. १९८० च्या दशकात संभाजी भिडे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघात कार्यरत होते. मात्र पुढे त्यांनी संघापासून फारकत घेतली. ‘श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान’ ही संघटना स्थापन केली. देशात बाबरी आणि श्रीराम मंदिराचा वाद उफाळला होता तेव्हा या संघटनेने जोर धरला होता. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास संभाजी भिडे सांगत असतात. त्यांना भिडे गुरुजी असंही संबोधलं जातं.