राज्याच्या प्रशासनातील सर्वात प्रतिष्ठेचे आणि अनन्यसाधारण महत्त्वाच्या अशा मुख्य सचिव पदावर विराजमान होण्याची संधी दोन वेळा हुकल्यानंतरही नाउमेद न होता गृह आणि सामान्य प्रशासन अशा दोन्ही महत्त्वाच्या विभागांची जबाबदारी समर्थपणे हाताळणाऱ्या, सुजाता सौनिक यांची अखेर रविवारी मुख्य सचिवपदी नियुक्ती झाली. या पदावरील पुरुष अधिकाऱ्यांची मक्तेदारी मोडीत काढण्याचा आणि राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान मिळविण्यात यश आले.
भारतीय प्रशासन सेवेच्या १९८७ च्या तुकडीतील राज्यातील सर्वांत जेष्ठ अधिकारी असलेल्या सौनिक यांनी आपल्या ३७ वर्षांच्या प्रशासकीय सेवेत राज्यात विविध ठिकाणी काम केले आहे. सौनिक यांनी सार्वजनिक आरोग्य, हवामान बदल आणि आपत्ती व्यवस्थापन, कौशल्य विकास, प्रशासन अशा अनेक विभागांत अनेक उपक्रम यशस्वीपणे राबविणाऱ्या आणि राज्य तसेच केंद्र सरकारमध्ये विविध पातळीवर धोरणे तयार करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. तसेच कंबोडिया आणि कोसोवो येथे आंतरराष्ट्रीय स्तरावर दोन संयुक्त राष्ट्र मिशनमध्ये काम केले आहे. तसेच त्यांनी केंद्र सरकार आणि संयुक्त राष्ट्रातही विविध महत्त्वाच्या पदांवर काम करताना आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे.
मूळच्या हरियाणातील असलेल्या सुजाता सौनिक यांनी आपले शालेय शिक्षण चंडीगड येथे पूर्ण केले तर पंजाब विद्यापीठातून इतिहास या विषयातून एमए केले आहे. सौनिक यांनी विद्यापीठातून प्रथम येत सुवर्णपदक पटकावले होते. सौनिक यांचे वडीलही भारतीय प्रशासन सेवेत अधिकारी होते.
भारतीय प्रशासन सेवेत दाखल झाल्यानंतर रत्नागिरी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, जळगाव जिल्हाधिकारी, नाशिक महापालिका आयुक्त या पदावर काम केले. सध्या गृह व सामान्य प्रशासन विभागाच्या अप्पर मुख्य सचिव म्हणून काम करताना पोलीस दलात शिस्त आणतानाच काही नवीन प्रयोग त्यांनी केले. आपल्या स्पष्ट, निर्भिड आणि रोखठोक स्वभावामुळे प्रशासनात आपली वेगळी जरब निर्माण करणाऱ्या सौनिक यांनी सामान्य प्रशासन विभाग (सेवा), सार्वजनिक आरोग्य, कौशल्य विकास, वित्त विभागात वित्तीय सुधारणा आदी महत्त्वाच्या विभागांच्या सचिवपदाची जबाबदारी सांभाळली आहे.