प्रतिनिधी : मुंबई, २० सप्टेंबर २०२५
कॅन्सर पेशंट्स एड असोसिएशन (CPAA) व पवन हंस लिमिटेड जुहू विमानतळ, मुंबई (भारत सरकारचे उपक्रम) यांच्या संयुक्त विद्यमाने, रोज डे २०२५ च्या औचित्याने २० सप्टेंबर २०२५ रोजी कॅन्सरग्रस्त मुलांसाठी हेलिकॉप्टर जॉय राईडचे विशेष आयोजन करण्यात आले.
रोज डे दरवर्षी २२ सप्टेंबर रोजी संपूर्ण देशभर साजरा केला जातो. या दिवसाचे उद्दिष्ट कॅन्सरग्रस्त रुग्णांना आनंद, आशा आणि प्रोत्साहन देणे, तसेच त्यांच्या प्रवासात ते एकटे नाहीत याची जाणीव करून देणे हे आहे.
या परंपरेला पुढे नेत, CPAA अनेक वर्षांपासून रुग्णांसाठी, विशेषतः उपचार घेत असलेल्या मुलांसाठी, आनंद आणि मानसिक बळ देणाऱ्या उपक्रमांचे आयोजन करत आहे.
यावर्षी रोज डे २०२५ च्या कार्यक्रमांतर्गत, २५ कॅन्सरग्रस्त मुलांना आकाशात उंच भरारी घेण्याचा अनोखा अनुभव देण्यात आला. मुंबई शहरावर हेलिकॉप्टरने फेरफटका मारण्याचा हा अनुभव त्यांच्यासाठी दैनंदिन संघर्षांपलीकडील आनंद, स्वातंत्र्य आणि उत्साहाचा क्षण ठरला.
या प्रसंगी CPAA च्या प्रतिनिधींनी सांगितले की, अशा उपक्रमांचा उद्देश फक्त मुलांच्या चेहऱ्यावर हसू आणणे नाही तर त्यांच्या व त्यांच्या कुटुंबियांच्या मनात कायमस्वरूपी आठवणी निर्माण करणे हा आहे.
या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन पवन हंस लि.जुहू विमानतळ यांच्या सहकार्याने शक्य झाले. तसेच CPAA ने वैद्यकीय मदत व सुरक्षेची संपूर्ण व्यवस्था केली होती.
रोज डे हा दिवस प्रेम, काळजी व साथ यांचे प्रतीक आहे. CPAA कॅन्सरग्रस्तांच्या जीवनात करुणा, आधार व अर्थपूर्ण अनुभवांद्वारे सातत्याने सकारात्मक बदल घडवण्यास कटिबद्ध आहे.
या हेलिकॉप्टर राईडला सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री सौ. भाग्यश्री यांचीही उपस्थिती लाभली. त्यांच्या सहवासामुळे मुलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला. आजारपणाच्या वेदनादायी प्रवासात त्यांना क्षणभर का होईना, सुखाचा अनुभव मिळाला आणि त्यांचे एक स्वप्न पूर्ण झाले.