जालना प्रतिनिधी दिनांक:- 2 ऑक्टोंबर 2025 येथील सिद्धार्थ कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात धम्मचक्र प्रवर्तन दिन, महात्मा गांधी जयंती व लालबहादूर शास्त्री जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या संयुक्त कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रमेश देशमुख उपस्थित होते तर महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रो.डॉ.सुनील मेढे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रा. अनिल वैद्य व प्रा. डॉ.मोठाभाऊ मोरे यांनी आपले विचार व्यक्त केले.
कार्यक्रमाची सुरुवात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. सर्वप्रथम प्राध्यापक अनिल वैद्य यांनी धम्मचक्र प्रवर्तन दिनावर आपले विचार व्यक्त करताना त्यांनी बाबासाहेब आंबेडकर आंबेडकरांनी धर्मातराची घोषणा का केली, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्मच का स्विकारला, धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणजे काय, धम्मचक्र प्रवर्तन दिन का साजरा केला जातो, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला काय दिलं, धर्मांतराचा मुळ उद्देश काय.या विषयाला हात घातला . तसेच बाबासाहेबांनी बौद्ध धर्माचीच दीक्षा का घेतली याविषयी आपल्या वाणीतून तत्कालीन वर्णव्यवस्था, कठोर जातीव्यवस्था यातून बहुजन समाजाला उच्चवर्णीयांनी कसे बाजूला टाकले हे बाबासाहेबांना पाहवत नव्हते.यातूनच पुढे धम्मचक्र क्रांती घडली व बाबासाहेबांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली हे सांगतानाच बहुजनांवर बाबासाहेबांनी केलेले उपकार देखील सविस्तरपणे आपल्या भाषणात व्यक्त केले. यानंतर दुसरे वक्ते प्रा.डॉ.मोठाभाऊ मोरे यांनी भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जीवन कार्यावर सखोल असा प्रकाश टाकला. त्यांच्या जीवनात त्यांनी जिद्द चिकाटी त्याचबरोबर प्रामाणिकपणा कसा क्षणाक्षणाला जपला कुठलीही लालसा न ठेवता त्यांनी आपल्या पदाचा उपयोग समाजासाठी केवळ आणि केवळ केला हेही त्यांनी आपल्या भाषणात सविस्तरपणे सांगितले. यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्यां डॉ.र.तु.देशमुख यांनी आपल्या अध्यक्षीय समारोपात धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे ऐतिहासिक महत्त्व स्पष्ट केले व सामाजिक समानतेच्या मूल्यांवर प्रकाश टाकला. गांधीजींच्या अहिंसेच्या तत्त्वज्ञानाबरोबरच शास्त्रीजींच्या “जय जवान जय किसान” या घोषणेची आजच्या काळातील गरज उपस्थितांना पटवून सांगितली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रो.डॉ.संतोष पहारे यांनी मानले तर राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.










