मुंबई:प्रतिनिधी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर, घाटकोपर, झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाचे भूमिपूजन थाटामाटात संपन्न झाले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, आजचा दिवस खरोखरच ऐतिहासिक आहे. गेली 45 वर्षे अतिशय कठीण परिस्थितीत जगणाऱ्या रमाबाई आंबेडकर नगर आणि कामराज नगर येथील बांधवांचे हे स्वप्न आज साकार होत आहे. आमच्या सरकारने तुमच्यासाठी पाहिलेले स्वप्न आज वास्तवात उतरत आहे.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, हा प्रकल्प एमएमआरडीए आणि एसआरए संयुक्तरित्या जलद गतीने पूर्ण करेल. ही कामे दोन वर्षांच्या आत पूर्ण व्हावीत आणि रहिवाशांना त्यांच्या नव्या घरात प्रवेश मिळावा, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
झोपडपट्ट्यांनाही क्लस्टर पद्धतीने विकसित करून त्याठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध करून देणे हा आमचा उद्देश आहे. त्यासाठी नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत आम्ही मुंबईत मोठ्या प्रमाणावर क्लस्टर पॉलिसी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वांगीण विकास साधूनच आपण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समतेच्या विचारांना न्याय देऊ शकतो. दोन पैसे कमी उत्पन्न मिळाले तरी चालेल, पण क्लस्टर डेव्हलपमेंटद्वारे झोपडपट्ट्यांचा विकास नक्कीच करू. यासाठी 50 एकरांचे क्लस्टर शोधून ठेवले आहेत, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, मुंबईला ‘स्लम-फ्री’ बनवण्याबाबत अनेकांनी फक्त घोषणा दिल्या, परंतु प्रत्यक्षात ही प्रक्रिया आमच्या सरकारच्या काळात सुरू झाली. धारावीसारखी जगातील सर्वात मोठी झोपडपट्टी आज पुनर्विकासाच्या मार्गावर आहे. पुढील सात वर्षांत आम्ही 10 लाख लोकांना त्यांच्या हक्काच्या घरात नेऊ. तसेच धारावीतील कारागिरांसाठी कारखाने उपलब्ध करून देणार असून सुमारे 2 लाख लोकांना रोजगारही मिळणार आहे.
विकासामुळे रोजगार निर्माण होतो, लोकांच्या हाताला काम मिळते, घर मिळाले की सामान्य माणसाच्या आयुष्यात खरा बदल घडतो आणि तो बदल घडवण्याचे काम आमचे सरकार करत आहे. येथे सर्वांगीण विकास होईल आणि कोणालाही घर व विकासापासून वंचित राहू देणार नाही, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री मंगलप्रभात लोढा, मंत्री ॲड. आशिष शेलार, राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, आमदार राम कदम, आमदार पराग शाह व इतर मान्यवर उपस्थित होते.