मुंबई प्रतिनिधी:
मनसेच्या दीपोत्सवाचा उद्धव ठाकरे यांनी पेटवला दिवा,
ठाकरे कुटुंब एकत्र, फटाके अन् दिव्यांच्या रोषणाईनं शिवाजी पार्क उजळला
मनसेच्या दीपोत्सवाचं उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. दीपोत्सवासाठी ठाकरे सहकुटुंब उपस्थित होतं. फटाके, दिव्यांच्या रोषणाईनं शिवाजी पार्क परिसर उजळला होता.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दीपोत्सवाचं शुक्रवारी शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. विशेष म्हणजे, या दीपोत्सवासाठी उद्धव ठाकरे सहकुटुंब शिवाजी पार्कवर उपस्थित होते. मनसेकडून या दीपोत्सवाची कार्यक्रम पत्रिका जाहीर झाल्यानंतर उद्घाटक म्हणून उद्धव ठाकरे यांचं नाव समोर आलं. तेव्हापासूनच मनसेचा हा दीपोत्सव चर्चेचा विषय ठरला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूची विविध कार्यक्रमांच्या निमित्तानं सातत्यानं होणारी भेट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
जेव्हा जेव्हा ठाकरे बंधू एकत्र तेव्हा तेव्हा राजकीय वर्तुळात चर्चा : उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे जेव्हा-जेव्हा एकत्र येतात, तेव्हा-तेव्हा राजकीय वर्तुळात चर्चा झाली. मात्र, शुक्रवारी झालेल्या मनसेच्या दीपोत्सवात उद्धव आणि राज ठाकरे एकत्र आले पण त्यांनी राजकीय भाष्य केलं नाही. आपल्या भाषणादरम्यान उद्धव ठाकरे यांनी कोणतंही राजकीय भाष्य करणं टाळलं. तर, राज ठाकरेंनी देखील केवळ दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. उद्घाटनासाठी उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरे यांच्या निवासस्थानी दाखल झालं. उद्धव ठाकरे जवळपास अर्धा तास राज ठाकरेंच्या घरी होते. दीपोत्सव उद्घाटनानंतर दोन्ही बंधूंनी पुनर्बांधणी करण्यात आलेल्या शिवाजी पार्क जिमखान्याची पाहणी देखील केली.