मुंबई प्रतिनिधी:
मुंबईतील राम मंदिर रेल्वे स्थानकावर काल मध्यरात्री घडलेला प्रसंग थरारक आणि प्रेरणादायी ठरला आहे. मुंबईच्या धावत्या लोकलमध्ये एका गर्भवती महिलेला प्रसूती वेदना सुरू झाल्या. यावेळी एका धाडसी तरुणाने क्षणाचाही विलंब न लावता ट्रेनची इमर्जन्सी चेन खेचून गाडी थांबवली. त्यानंतर राम मंदिर रेल्वे स्थानकावर मेडिकल सुविधा नसताना विकास बेद्रे या तरुणाने तात्काळ डॉ. देविका देशमुख यांना व्हिडिओ कॉल केला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली, वैद्यकीय अनुभव नसतानाही विकासने यशस्वीरित्या महिलेची प्रसूती केली.
काल रात्री 12.40 च्या सुमारास गर्भवती महिला गोरेगाव रेल्वे स्थानकावरून मुंबईकडे लोकल ट्रेनने प्रवास करत होती. प्रवास करत असताना अचानक तिला तीव्र प्रसूती वेदना सुरू झाल्या. ती मदतीसाठी ओरडू लागली. यावेळी त्याच डब्ब्यातून प्रवास करणारा विकास दिलीप बेद्रे या तरुणाने डॉ. देविका देशमुख यांच्याकडून व्हिडीओ कॉलवर प्रसूतीची संपूर्ण प्रक्रिया स्टेप-बाय-स्टेप समजून घेतली. विकास बेद्रे यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून, कोणत्याही वैद्यकीय ज्ञानाचा अनुभव नसतानाही, डॉक्टरांनी सांगितलेल्या प्रत्येक सूचनांचे तंतोतंत पालन केलं आणि प्रसूती यशस्वीरित्या पार पडली. आई आणि बाळ दोघेही सुरक्षित आहेत.
मध्यरात्री राम मंदिर स्थानकात बाळाच्या रडण्याचा आवाज
डॉ. देविका देशमुख यांनी मध्यरात्रीचा वेळ असूनही विकास बेद्रे यांचा व्हिडिओ कॉल तात्काळ उचलला आणि परिस्थिती समजून घेतली. त्यानंतर त्यांनी विकासला शांतपणे प्रसूतीची संपूर्ण प्रक्रिया टप्प्याटप्प्याने समजावून सांगितली. विकास बेद्रे यांनी डॉक्टरांच्या मार्गदर्शनानुसार प्रत्येक सूचना काळजीपूर्वक पाळली. वैद्यकीय शिक्षणाचा कोणताही अनुभव नसतानाही त्यांनी अपवादात्मक धैर्य आणि संयम दाखवला. या तणावपूर्ण आणि जीवघेण्या प्रसंगी विकास यांनी दाखवलेले अफाट धैर्य आणि समयसूचकता हे खरोखर कौतुकास्पद ठरले. त्यांच्या प्रयत्नांना यश आले आणि राम मंदिर रेल्वे स्थानकावर रात्री सव्वा एक ते दोनच्या दरम्यान बाळाच्या रडण्याचा आवाज घुमला. त्या महिलेने गोंडस मुलीला जन्म दिला, आणि उपस्थित प्रवाशांसह रेल्वे कर्मचाऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला.
लोकलमध्ये महिलेला प्रसूती वेदना, व्हिडीओ कॉलवर सुखरूप प्रसूती, अयोध्येतून दर्शन घेऊन परतताना मुंबईतील लोकलमध्ये महिला प्रसूती वेदनेनं विव्हळताना दिसली; डॉक्टर मैत्रिणीला व्हिडीओ कॉल केला अन्…रोहित पवारांनी कौतुकाने पाठ थोपटली.