जाफराबाद प्रतिनिधी दिनांक : जालना जिल्हा जाफराबाद येथील सिद्धार्थ कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात स्त्री शिक्षणाच्या जनक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रमेश देशमुख हे होते तर कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रो.डॉ.एम.जी. मोरे हे होते तसेच महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रो.डॉ.सुनील मेढे यांची प्रमुख उपस्थिती होती.सर्वप्रथम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व सर्व महामानवांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे वक्ते डॉ. एम.जी.मोरे यांनी आपले विचार व्यक्त करताना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाची द्वारे खुली केली ती प्रथम शाळा पुण्याच्या भिडे वाड्यात सुरू करून त्यानंतर त्यांच्या शैक्षणिक कार्याचा प्रवास सुरू झाला. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी सर्वप्रथम स्वतः शिक्षण घेतले व नंतर भारतातील पहिल्या महिला स्त्री शिक्षिका म्हणून उदयास आल्या त्यांनी शिक्षणाचे तसेच समाज सुधारण्याचे व्रत हाती घेतले व यामध्ये कार्य करत असताना स्त्री,शूद्र यांच्या शिक्षणासाठी आणि सामाजिक समतेसाठी लढा दिला त्यांच्या मते स्त्रियांना शिक्षणाचा समान अधिकार असायला हवा होता कारण शिक्षणामुळे स्त्री आत्मनिर्भर,विवेकी होते असे त्यांचे ठाम मत होते. शिक्षणात जात,धर्म,लिंग असा भेद नको दलित,वंचित घटकापर्यंत शिक्षण पोहोचले पाहिजे हा त्यांचा खरा हेतू होता. व तो त्यांनी पूर्ण करून दाखविला. अध्यक्षीय समारोपात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रमेश देशमुख यांनी आपले विचार व्यक्त करताना ज्या काळी स्त्रियांना घराबाहेर पडणे सुद्धा पाप मानले जायचे आणि रुढीवादी समाज स्वातंत्र्य,समता,बंधुता व न्याय या मूल्याशी जाणीवपूर्वक अपरिचित होता अशा काळात महात्मा ज्योतिबा फुले यांनी आरंभलेल्या क्रांतीची ज्योत बनवून माता सावित्रीबाई फुले आयुष्यभर तेवत राहिल्या. समाजातील अनिष्ट आणि अन्याय विचारांचा खंबीरपणे सामना करत प्रसंगी दगडधोंडे व शेणांचा मारा सहन करूनही त्यांनी स्त्रिया,विधवा, महिला,अनाथ आणि वंचित घटकासाठी शिक्षण,समता आणि न्यायाचा मार्ग खुला केला व आपल्या अध्यक्षीय समारोपाचा एका सुंदर अशा कवितेच्या सादरीकरणाने समारोप केला. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना ग्रंथालयातील पुस्तकांचे वाचन करण्याचे आवाहनही केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रो. डॉ.संतोष पहारे यांनी केले तर आभार प्रा.एस.एम.पाटील यांनी मानले या कार्यक्रमास महाविद्यालयातील प्रसिद्ध प्रमुख प्रा.अनिल वैद्य यांची उपस्थिती होती. महाविद्यालयातील विद्यार्थी, विद्यार्थिनी,प्राध्यापक,शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.












