दावोस मध्ये महाराष्ट्रात पंधरा लाख कोटी रूपयांच्या गुंतवणुकीचे करार झाले आहेत. या गुंतवणुकीतून सुमारे तेरा लाख लोकांना रोजगार मिळणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दावोस दौऱ्यावर टीका करण्याऱ्या संजय राऊत यांनी आजवर तेरा लोकांना तरी रोजगार दिले का, असा सणसणीत टोला भारतीय जनता पार्टीचे प्रदेश माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांनी बुधवारी लगावला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत श्री. बन बोलत होते. उद्धव ठाकरे यांनी अडीच वर्षे मुख्यमंत्री असताना तेराशे लोकांना तरी रोजगार दिला होता का, याचे उत्तर संजय राऊतांनी द्यावे असेही श्री. बन म्हणाले.
श्री. बन म्हणाले की, भारतात सर्वाधिक विदेशी गुंतवणूक आणण्याचे काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दावोस दौऱ्यामध्ये केले आहे. विदेशी गुंतवणुक आणण्यासाठी कौशल्य लागते. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या दावोस दौऱ्यावर टीका करणाऱ्या संजय राऊतांनी आदित्य ठाकरेंना दावोस दौऱ्यातून किती गुंतवणूक आणली हे विचारण्याचे धाडस दाखवावे. दावोस दौऱ्यात महाराष्ट्रातील गुंतवणुकीचे जे करार झाले आहेत त्यातून महाराष्ट्रात निर्माण होणाऱ्या रोजगारातून संजय राऊतांना आनंद व्हायला होता. पण राऊतांनी आनंदाऐवजी जळफळाट व्यक्त केला आहे. दावोस दौऱ्याला संजय राऊतांचा एवढा विरोध असेल तर, आदित्य ठाकरे हे दावोसला कशासाठी गेले होते, याचे उत्तरही संजय राऊतांनी द्यावे, असेही बन यांनी सांगितले.
महाराष्ट्राला सुशासन देण्याचे काम देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांनी केले आहे. त्यामुळेच विदेशी गुंतवणूकदारांची सर्वाधिक पसंती महाराष्ट्राला मिळत आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या कर्तृत्वामुळे देवाभाऊंचा देशात नव्हे तर जगभरात विश्वसनीयतेचा ब्रॅंड तयार झाला आहे, त्यामुळेच संजय राऊतांचे पोट दुखू लागले आहे, अशी बोचरी टीकाही श्री.बन यांनी केली.
श्री. बन यांनी सांगितले की, भारतीय जनता पार्टी हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, त्यामुळेच नितीन नबीन यांच्या सारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षपद भूषवण्याची संधी मिळते. उबाठा गटामध्ये फक्त ठाकरे कुटुंबातील व्यक्तींनाच संधी मिळते. संजय राऊतांनी राज्यसभा निवडणुकीत पक्षाच्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला संधी देण्याऐवजी स्वत: चे नाव घुसडले.
राहुल शेवाळे यांनी जाहीर आरोप करणे टाळावे
ज्येष्ठ नेते व माजी खासदार राहुल शेवाळे यांनी जाहीरपणे भाजपा कार्यकर्त्यांवर आरोप प्रत्यारोप करणे टाळले पाहिजे. मुंबई महापालिकेत भारतीय जनता पार्टीचे अनेक उमेदवार 100 ते 300 एवढ्या कमी मतांनी पराभूत झाले आहे. या उमेदवारांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर आरोप केलेले नाहीत. महायुतीमध्ये सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांना मदत केल्यामुळे महायुतीला चांगले यश मिळाले आहे. त्यामुळेच राहुल शेवाळे आणि सर्वांनीच युतीमध्ये मतभेद होतील अशी वक्तव्ये करणे टाळावे, असे श्री. बन म्हणाले.
















