छत्रपती संभाजीनगर, दि.२१ : ‘फोटोजेनी’ चित्रपट महोत्सवासारखा इतका चांगला महोत्सव शहरात होत आहे, याचा मला मनस्वी आनंद आहे. लघुपट मला कायम मनाच्या जवळचे वाटतात. या माध्यमातून एवढ्याशा अवकाशात खूप काही मांडलं आणि थेट बोललं जातं. नवनवीन क्षितिजे धुंडाळत असताना आपल्या सर्वांची उत्तम कारकीर्द घडो आणि या कारकिर्दीसह तितकेच चांगले नागरिक म्हणून तुमची ओळख या जगात सिद्ध होवो, असे प्रतिपादन अभिनेत्री चिन्मयी सुमित यांनी यावेळी केले.
महात्मा गांधी मिशन विद्यापीठच्या स्कूल ऑफ फिल्म आर्ट्सच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय ‘फोटोजेनी’ चित्रपट महोत्सवाचा समारोप समारंभ सुप्रसिद्ध अभिनेत्री चिन्मयी सुमित यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी, अभिनेत्री चिन्मयी सुमित यांनी उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी विविध विभागात प्रथम क्रमांक पटकविणाऱ्या कलाकारांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
या समारंभास एमजीएम विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. आशिष गाडेकर,अभिनेते गणेश देशमुख, अबीर चित्रपटाचे दिग्दर्शक आकाश शिंदे, विभागप्रमुख डॉ.शिव कदम, स्कूल ऑफ डिझाईनच्या संचालिका शुभा महाजन, दिग्दर्शक, कलाकार, विद्यार्थी व सर्व संबंधित मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना अभिनेत्री चिन्मयी सुमित म्हणाल्या, मराठी शाळांसाठी मी लढत असून जेंव्हाही कोणत्याही कार्यक्रमात सहभागी होत असते तेंव्हा मला कोणत्या भाषेत बोलायचे, याचे पर्याय उपलब्ध असतात. आज मी माझ्या शहरात आली असून मी आज मराठी भाषेत बोलणार आहे. माझं बालपण या शहरात गेले असून शासकीय भाषेत हेडक्वार्टर म्हणतात तसे हे शहर माझ्यासाठी हार्ट क्वार्टर आहे.
फोटोजेनी’ चित्रपट महोत्सवाच्या माध्यमातून वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात. इतकं मोठं व्यासपीठ या महोत्सवाने उपलब्ध करून दिले आहे. या महोत्सवात ५० पेक्षा अधिक लघुपट सहभागी होणे, हे या महोत्सवाचे यश आहे. आपण सर्व विद्यार्थ्यांनी आपापल्या क्षेत्रात घडत रहा, वाढत राहा, बहरात राहा, आयुष्याची मजा घेत घडवत राहा, असे अभिनेत्री चिन्मयी सुमित यांनी यावेळी सांगितले.
कुलसचिव डॉ.आशिष गाडेकर यावेळी बोलताना म्हणाले, दिग्गज येतात आणि विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देतात. ‘फोटोजेनी’ चित्रपट महोत्सव येत्या काळात आणखी मोठा होईल. आपल्याला आणखी खूप पुढे जायचे असून विद्यार्थी याच प्रमाणे आपला दर्जा जपत कार्यरत राहतील, असा विश्वास व्यक्त करतो.
बुधवार, दिनांक २८ जानेवारी २०२६ ला शुभारंभ होणाऱ्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा हा महोत्सवपूर्व उपक्रम असून यास यावर्षी अत्यंत चांगला प्रतिसाद संपूर्ण देशभरातून मिळाला असल्याचे विभागप्रमुख डॉ. शिव कदम यांनी सांगितले.
















