नांदेड, दि.21- हिंद-दी-चादर श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागम शताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या गौरवशाली इतिहासाची, अतुलनीय बलिदानाची व समाजहितासाठी केलेल्या कार्याची माहिती सर्वसामान्यांपर्यंत, विशेषतः विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावी या उद्देशाने नांदेड येथे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या उपक्रमाअंतर्गत जिल्हाभरातील शाळांमध्ये चित्रकला, वक्तृत्व, गायन व निबंध अशा चार प्रकारच्या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. शालेय व तालुकास्तरावरील निवड प्रक्रियेनंतर प्रत्येक तालुक्यातून प्रत्येक स्पर्धेसाठी तीन विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पाठविण्यात आले होते. मंगळवार दिनांक 20 जानेवारी रोजी नांदेड येथील गुरु ग्रंथसाहेबजी भवन येथे या जिल्हास्तरीय स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडल्या. सदर कार्यक्रमास जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी उपस्थित राहून स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांशी संवाद साधला व त्यांच्या कलागुणांचे कौतुक करून त्यांना प्रोत्साहन दिले.
या स्पर्धांचे कामकाज जिल्हा निवड समिती यांच्या देखरेखीखाली पार पडले. समितीमध्ये डॉ. अमोल निळेकर, माध्यमिकचे शिक्षणाधिकारी माधव सलगर, प्राथमिकच्या शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे, शिक्षण विस्तार अधिकारी रोहिदास बस्वदे यांचा समावेश होता. तसेच सचखंड पब्लिक स्कूलचे प्राचार्य अनिल कौर खालसा यांनी गुरु ग्रंथसाहेबजी भवन व आवश्यक भौतिक सुविधा उपलब्ध करून दिल्या. या स्पर्धेतून निवड झालेल्या प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.
















