जालना प्रतिनिधी,
अंमली पदार्थांच्या सेवनामुळे मानवी शरीर व मनावर गंभीर परिणाम होत असून त्याचे दुष्परिणाम समाजावरही मोठ्या प्रमाणात दिसून येतात. त्यामुळे जिल्ह्यात अंमली पदार्थांचा प्रसार रोखण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी सतर्क राहून दोषींवर कायदेशीर व कडक कारवाई करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी दिले.
अंमली पदार्थांच्या वापरावर प्रतिबंध घालण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आज जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी कार्यकारी समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस उपविभागीय पोलीस अधिकारी आर. डी. निकाळजे, आयबीचे अक्षय चांदुरकर, हेड पोस्ट ऑफिसचे अमोल बेंडे, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या निरीक्षिका आश्विनी म्हस्के, अन्न व औषध प्रशासनचे सहायक आयुक्त जीवन जाधव, उपविभागीय अधिकारी जालना नायब तहसीलदार शैलेश राजमाने, पार्सल ऑफिसचे आर. रमन, जिल्हा समाज कल्याण अधिकारी आर. बी. मांटे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी मित्तल म्हणाल्या की, काही औषध विक्रेत्यांकडून बंदी घातलेल्या औषधांतील घटक असलेली पर्यायी औषधे विकली जात असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. त्यामुळे डॉक्टरांच्या वैध प्रिस्क्रिप्शनशिवाय कोणतीही औषधे विक्री होणार नाहीत, याची काटेकोर अंमलबजावणी करावी. यासाठी मेडिकल स्टोअर्सची नियमित तपासणी करण्यात यावी.
टपाल विभागाने पार्सलची देवाण-घेवाण करताना पार्सलमधील साहित्याची योग्य तपासणी करावी. अंमली पदार्थांची विक्री किंवा सेवन करणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
युवा पिढीला अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांची माहिती देणे अत्यावश्यक असल्याचे नमूद करत जिल्हाधिकारी मित्तल यांनी शाळा व महाविद्यालयांमध्ये जनजागृती कार्यक्रम राबविण्याचे आदेश दिले. तसेच ग्रामीण भागात खसखस किंवा गांजाची अवैध लागवड होणार नाही, यासाठी कृषी सहाय्यक व पोलीस पाटील यांनी दक्षता घ्यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.
शाळा, महाविद्यालयांपुरते मर्यादित न राहता ग्रामपंचायत स्तरावरही व्यापक जनजागृती मोहीम राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या. बैठकीत अंमली पदार्थांविरोधातील गुन्हे व त्यावर करावयाच्या कार्यवाहीचा आढावा घेण्यात आला आहे















