छत्रपती संभाजीनगर, दि.२२ : जगभरातील सर्वोत्कृष्ट चित्रपट मराठवाड्यातील रसिकांपर्यंत पोहोचवणार्या अकराव्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची घोषणा करण्यात आलेली असून बुधवार, दि. २८ जानेवारी ते रविवार, दि. ०१ फेब्रुवारी २०२६ या दरम्यान हा महोत्सव आयनॉक्स थिएटर, प्रोझोन मॉल, छत्रपती संभाजीनगर येथे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरील कलावंताच्या मांदियाळीत संपन्न होणार आहे. नाथ ग्रुप, एमजीएम विद्यापीठ, यशवंतराव चव्हाण सेंटर व मराठवाडा आर्ट कल्चर व फिल्म फाउंडेशन आयोजित अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव हा भारत सरकार व महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने संपन्न होत असून प्रोझोन मॉल यांचे विशेष सहकार्य या फेस्टिव्हलला मिळालेले आहे.
या महोत्सवांतर्गत शुक्रवार, दि.२३ जानेवारी २०२६ रोजी सायं. ६.०० वा. प्रोझोन मॉल येथे सिनेसृष्टीतील दिग्गज कलाकारांच्या जन्मशताब्दी वर्ष तसेच आदरांजली म्हणून चित्रपट कलादालन व पोस्टर प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाचे संस्थापक अध्यक्ष नंदकिशोर कागलीवाल यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. याप्रसंगी एमजीएम विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.आशिष गाडेकर, संयोजक नीलेश राऊत, महोत्सवाचे कला संचालक डॉ.शिव कदम, डॉ.रेखा शेळके यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
या प्रदर्शनामध्ये गुरू दत्त, राज खोसला, धर्मेंद्र, असरानी, सतीश शाह, कोटा श्रीनिवास राव, श्रीहरी यांच्या गाजलेल्या सिनेमांच्या व त्यांच्या अजरामर कारकिर्दीवर छायाचित्रांचा व माहितीचा समावेश असणार आहे. सदरील कलादालन व प्रदर्शन रविवार, दि. १ फेब्रुवारी २०२६ पर्यंत सर्व नागरिकांसाठी प्रोझोन मॉल येथे विनामुल्य खुले असणार आहे. या प्रदर्शनाची निर्मिती व संकल्पना ही एमजीएम स्कुल ऑफ फिल्म आर्टस् च्या वतीने करण्यात आलेली आहे. याकरीता डॉ.शिव कदम, डॉ.योगिता महाजन, प्रा.जाई कदम, सिध्दीका दळवी व महेश हरबक यांनी परिश्रम घेतले आहे. या कलादालनास जास्तीत जास्त नागरिकांनी भेट देण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
















