छत्रपती संभाजीनगर, दि. २२ : महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी अन्वेषण पश्चिम विभाग विद्यार्थी संशोधन अधिवेशन २०२५–२६ मध्ये उल्लेखनीय कामगिरी करत विद्यापीठाच्या नावलौकिकात भर घातली आहे. गुजरात राज्यातील आनंद येथे सरदार पटेल विद्यापीठात पार पडलेल्या या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत एमजीएम विद्यापीठाच्या तीन संघांनी तृतीय क्रमांक पटकावला असून राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे. ही राष्ट्रीय स्पर्धा फेब्रुवारी २०२६ मध्ये हिमाचल प्रदेशात होणार आहे.
या स्पर्धेत पश्चिम विभागातील विविध राज्यांतील विद्यापीठांच्या विद्यार्थ्यांनी आपले संशोधन सादर केले होते. नाविन्यपूर्ण संकल्पना, सामाजिक उपयुक्तता, संशोधनाची गुणवत्ता व सादरीकरण या निकषांवर एमजीएमच्या विद्यार्थ्यांनी स्पर्धेत विजयी कामगिरी केली आहे.
एमजीएम विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट ऑफ बायोसायन्सेस अँड टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांनी केळीच्या तंतूपासून जैव-संकरित लेदरची निर्मिती हा पर्यावरणपूरक व उद्योगाभिमुख प्रकल्प सादर केला. या संघात हिदायत हबीब शेख, ध्रुव रवींद्र कल्याणकर व श्रेयस बाळा साहेब होळंबे या विद्यार्थ्यांचा सहभाग होता. डॉ.राजा कुमार परबथिना यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकल्पाने तृतीय क्रमांक मिळवत राष्ट्रीय स्पर्धेत आपला सहभाग निश्चित केला आहे.
एमजीएम विद्यापीठाच्या स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांनी सुरक्षा हा सामाजिकदृष्ट्या महत्त्वाचा प्रकल्प सादर केला. दिया मनोजसिंह चुफल व उत्कर्ष मधुकर शिंदे यांनी पियुष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सादर केलेल्या या प्रकल्पाला परीक्षकांकडून विशेष दाद मिळाली आणि संघाने तृतीय क्रमांक पटकावला असून संघ राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे.
एमजीएम विद्यापीठाच्या जवाहरलाल नेहरू अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी रिकी हा आंतरशाखीय प्रकल्प सादर करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. स्टीव्हन डी’सिल्वा, जसज्योत सिंग, महिमा थरेवाल व निर्भय खेडेकर या विद्यार्थ्यांनी डॉ.आरती साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली उत्कृष्ट सादरीकरण करत तृतीय क्रमांक मिळवला आहे. हाही संघ राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे.
एमजीएमच्या विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम, कुलगुरू प्रा.डॉ. विलास सपकाळ, कुलसचिव डॉ. आशिष गाडेकर तसेच सर्व संबंधित प्राध्यापक व मार्गदर्शकांनी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. त्यांनी विद्यार्थ्यांना पुढील राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा देत, संशोधन, नवोपक्रम आणि सामाजिक बांधिलकी यांचा संगम साधणारी अशीच भरीव कामगिरी पुढेही सुरू ठेवावी, असे आवाहन केले आहे.









