छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर व जालना जिल्ह्यात महावितरणने वीजबिल थकबाकीदारांविरुद्ध धडक मोहीम सुरू केली आहे. वारंवार आवाहन करूनही बिल भरण्यास प्रतिसाद न देणाऱ्या जवळपास तीन हजार ग्राहकांचा वीजपुरवठा चालू महिन्यात खंडित करण्यात आला आहे. थकबाकीदारांनी बिल न भरल्यास त्यांना अंधारात राहण्याची वेळ येणार आहे.
छत्रपती संभाजीनगर परिमंडलात वीजबिलांच्या प्रचंड थकबाकीमुळे महावितरणसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. छत्रपती संभाजीनगर शहर, ग्रामीण व जालना या तिन्ही मंडलांत घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक व इतर वर्गवारीतील 4 लाख 34 हजार 440 ग्राहकांकडे 282 कोटी 87 लाख रुपयांची थकबाकी आहे. यात छत्रपती संभाजीनगर शहर मंडलात 1 लाख 17 हजार 771 ग्राहकांकडे 63 कोटी 44 लाख, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण मंडलात 1 लाख 82 हजार 54 ग्राहकांकडे 69 कोटी 60 लाख तर जालना मंडलातील 1 लाख 34 हजार 615 ग्राहकांकडे 149 कोटी 83 लाख रुपयांची रुपयांची थकबाकी आहे. वारंवार आवाहन करूनही अनेक ग्राहकांनी वीजबिल न भरल्याने महावितरणच्या थकबाकीचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे.
महावितरणने आता थकबाकीदारांची वीजजोडणी खंडित करण्याची धडक मोहीम सुरू केली आहे. या महिन्यात छत्रपती संभाजीनगर शहर मंडलातील 776, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण मंडलातील 491 व जालना मंडलातील 1611 ग्राहकांचा वीजपुरवठा तात्पुरता खंडित करण्यात आला आहे.
ऑनलाईन पेमेंट करा, निश्चिंत रहा
ग्राहकांना वीजबिलाचा भरणा करण्यासाठी रांगेत उभे रहावे लागू नये, त्यांचा वेळ वाचावा, यासाठी महावितरणने ऑनलाइन वीजबिल भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यूपीआय नेट बँकिंग, वॉलेट्स, मोबाईल अॅप्सवरील फोन पे, गुगल पे आणि महावितरणच्या वेबसाइटद्वारे घरबसल्या वीजबिल भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. विशेष म्हणजे ऑनलाईन व वेळेत पेमेंट करणाऱ्यांना महावितरणकडून भरघोस सूट दिली जाते.
कारवाईत अडथळे आणल्यास गुन्हे दाखल होणार
थकबाकी वसुलीसाठी महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची विशेष स्वतंत्र पथके तैनात करण्यात आली आहेत. काही संवेदनशील भागांत कर्मचाऱ्यांना विरोध होण्याची शक्यता लक्षात घेता, ही कारवाई पोलिस बंदोबस्तात केली जाणार आहे. कोणत्याही प्रकारची गुंडगिरी किंवा राजकीय दबावाला बळी न पडता ही मोहीम अधिक गतिमान केली जाणार असल्याचे सांगण्यात आले. मोहिमेत अडथळा आणणाऱ्यांवर पोलिसांत गुन्हे दाखल करण्याचा इशारा महावितरणने दिला आहे.
डिस्कनेक्शनचा मन:स्ताप व रिकनेक्शनचा भुर्दंड टाळा
महावितरणने आपले वीज कनेक्शन तोडण्याची वाट न पाहता ग्राहकांनी चालू महिन्याच्या वीजबिलासह थकबाकीची रक्कम विनाविलंब भरून सहकार्य करावे. थकबाकीसाठी कनेक्शन तोडल्यास बिलाच्या रकमेसह पुनर्जोडणी शुल्क भरावे लागते. सिंगल फेज जोडणीसाठी 310 रुपये तर थ्री फेजजोडणीसाठी 520 रुपये पुनर्जोडणी शुल्क आकारले जाते. हा भुर्दंड टाळण्यासाठी वेळेत वीजबिल भरणे आवश्यक असल्याचे महावितरणने म्हटले आहे.
महावितरणतर्फे सर्व वर्गवारीतील ग्राहकांनी तातडीने थकीत वीजबिल भरणे नियमाने गरजेचे आहे. अन्यथा महावितरणचे कर्मचारी त्यांचा वीजपुरवठा खंडित करू शकतात. त्यामुळे होणारी गैरसोय टाळण्यासाठी थकित वीजबिल भरून महावितरणला सहकार्य करावे.
– पवनकुमार कछोट, मुख्य अभियंता, महावितरण, छत्रपती संभाजीनगर परिमंडल
कॅप्शन : छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील सावंगी गावात मुख्य अभियंता पवनकुमार कछोट यांच्या उपस्थितीत थकबाकीदाराचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम राबवण्यात आली.









