नांदेड, दि. २२ जानेवारी :- स्थानिक शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीस चालना देणारा व ग्रामीण भागात रोजगारनिर्मितीची संधी उपलब्ध करून देणाऱ्या शेवग्यापासून तयार करण्यात येणाऱ्या आरोग्यदायी पावडर व बिस्कीट निर्मिती उद्योगाचे औपचारिक अनावरण जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या शुभहस्ते मोठ्या उत्साहात पार पडले.
मनरेगा अंतर्गत किनवट तालुक्यातील अति प्रभावित मेगा पाणलोट (HIMWP-MH) प्रकल्पाअंतर्गत सुरू असलेल्या विविध कामांची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी क्षेत्र भेट दिली. यावेळी शेवगा उत्पादक शेतकरी अभिजित जमादार यांच्या शेताला भेट देऊन किनवट तालुक्यात शेवगा उत्पादनाचे चांगले काम सुरू असल्याची माहिती घेतली. या भागात शेवग्यावर आधारित उद्योग उभारल्यास रोजगारनिर्मिती होऊन शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होऊ शकते, असे मत त्यांनी व्यक्त केले.
त्यानुसार जिल्हाधिकारी यांनी शेतकऱ्यांचा गट निर्माण करून मनरेगा अंतर्गत शेवगा लागवडीचे काम मंजूर करण्याचे निर्देश दिले तसेच सहाय्यक जिल्हाधिकारी जेनीतचंद्रा दोन्तुला यांना ITDP विभाग व कृषी विभाग यांच्या समन्वयातून शेवगा प्रक्रिया युनिट उभारण्याच्या सूचना दिल्या. यानंतर सहाय्यक जिल्हाधिकारी जेनीतचंद्रा दोन्तुला यांनी ITDP अंतर्गत नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत २४.५० लाख रुपयांचा निधी मंजूर करून कृषी विभागाअंतर्गत स्थापित ‘वनश्री आदिवासी शेतकरी उत्पादक गट’ या गटास प्रक्रिया युनिट उभारणीस मान्यता दिली.
सदर गटाने प्राथमिक स्तरावर सोलर ड्रायर उभारून शेवगा पावडर, शेवगा बिस्कीट तसेच शेवगा चहा पावडरची निर्मिती सुरू केली आहे. या उत्पादनांची विक्री विविध मॉल, दुकाने, मेडिकल व स्थानिक बाजारपेठेत करण्यात येत आहे. उत्पादनांचे स्थानिक पातळीवर विपणन सहाय्यक जिल्हाधिकारी जेनीतचंद्रा दोन्तुला यांनी केले असून जिल्हा पातळीवर जिल्हाधिकारी राहुल कर्डिले व उपजिल्हाधिकारी (रोहयो) हनमंत कोळेकर यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सांगितले की, हा उद्योग अनुसूचित जमाती (ST) कुटुंबे, महिला शेतकरी तसेच इतर प्रवर्गातील शेतकरी व शेतकरी गटांच्या आर्थिक सक्षमीकरणाच्या दृष्टीने सुरू करण्यात आला आहे. शेवगा पानांपासून पौष्टिक पावडर तयार करून मूल्यवर्धन करण्यात येणार असून त्यामुळे शेवगा उत्पादक शेतकऱ्यांना रोजगारासह त्यांच्या उत्पादनाला योग्य बाजारभाव मिळेल. स्थानिक पातळीवरच प्रक्रिया व विक्रीची सुविधा उपलब्ध होणार आहे.
“अशा प्रकारचे लघु उद्योग ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देणारे असून पोषणमूल्याने समृद्ध असलेल्या शेवग्याच्या उत्पादनातून आरोग्य व रोजगार या दोन्ही क्षेत्रांना लाभ होईल. शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन असे उपक्रम अधिक व्यापक स्वरूपात राबवावेत,” असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी नोडल अधिकारी चेतन जाधव, प्रादेशिक समन्वयक दिनेश खडसे, CSO RAES तालुका समन्वयक रवी उबाळे, शेतकरी अभिजित जमादार व संदीप हुरदूके यांच्यासह संबंधित अधिकारी व शेतकरी उपस्थित होते.
00000
वृत्त क्रमांक 87
इस्रायलमध्ये रिनोव्हेशन इंटिरियर वर्कसाठी भारतीय कुशल उमेदवारांची निवड प्रक्रिया सुरू
नांदेड, दि. 22 जानेवारी :- इस्रायल देशामध्ये Renovation Interior Work या क्षेत्रासाठी कुशल भारतीय उमेदवारांची मोठ्या प्रमाणावर भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ (NSDC) यांच्या मार्फत ही निवड प्रक्रिया राबविण्यात येत असून इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत, अशी माहिती जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त श्री. बा. सु. मरे यांनी दिली आहे.
या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांकडे किमान ३ वर्षांचा Renovation Interior Work मधील अनुभव असणे आवश्यक आहे. शैक्षणिक पात्रता किमान दहावी उत्तीर्ण, वय २५ ते ५० वर्षे, इंग्रजी वाचन, लेखन व संभाषणाचे ज्ञान असणे आवश्यक आहे. उमेदवाराने यापूर्वी इस्रायलमध्ये नोकरी केलेली नसावी. भारतातून स्वच्छ पोलिस क्लीयरन्स सर्टिफिकेट (PCC), व्यसनमुक्त इतिहास, शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम असणे, गंभीर आजार नसणे आवश्यक आहे. पासपोर्ट किमान तीन वर्षे वैध असणे, भारतीय नागरिकत्व असणे तसेच इस्रायलमध्ये कोणतेही नातेवाईक नसणे बंधनकारक आहे.
या भरती अंतर्गत एकूण २ हजार ६०० पदे उपलब्ध असून त्यामध्ये Plastering Work – १ हजार पदे, Ceramic Tiling – १ हजार पदे, Drywall Worker – ३०० पदे व Mason – ३०० पदांचा समावेश आहे. निवड व स्क्रीनिंग प्रक्रियेमध्ये राज्य शासनामार्फत प्राथमिक छाननी करून उमेदवारांची माहिती NSDC कडे पाठविण्यात येईल. त्यानंतर इंग्रजी ज्ञान, पात्रता, अनुभव व डोमेन ज्ञानाच्या आधारे पहिली स्क्रीनिंग प्रक्रिया होईल. वैध पासपोर्ट अनिवार्य असून निवड झालेल्या उमेदवारांची माहिती इस्रायल टीमकडे पाठविण्यात येईल. इस्रायल टीमकडून Name Check झाल्यानंतर उमेदवारांना प्रोफेशनल टेस्ट द्यावी लागेल. वैद्यकीय तपासणी व पार्श्वभूमी पडताळणी (गुन्हेगारी तपासणीसह) याचा खर्च उमेदवाराने स्वतः करावयाचा आहे. व्हिसा व विमान तिकीट उमेदवाराने Market Return पद्धतीने घ्यावे लागेल. प्रशिक्षण व प्री-डिपार्चर ओरिएंटेशन NSDC अंतर्गत अनिवार्य राहील.
वेतन व सुविधांबाबत किमान मासिक वेतन ६,२४७.६० NIS (सुमारे रुपये १,६२,५००) इतके राहील. दरमहा १८२ तास काम, २१ ते २६ कामाचे दिवस असतील. ओव्हरटाईम कंपनीच्या नियमानुसार दिला जाईल. निवास व वैद्यकीय विमा नियोक्त्याकडून उपलब्ध करून देण्यात येईल, मात्र त्याचे शुल्क पगारातून कपात करण्यात येईल. नोकरीची जागा इस्रायलमध्ये कुठेही असू शकते. करार कालावधीअंतर्गत पहिला व्हिसा वर्षअखेरीपर्यंत वैध असून त्यानंतर १-१ वर्षांनी वाढवून कमाल ६३ महिने कालावधीपर्यंत नोकरीची संधी उपलब्ध राहील. इच्छुक व पात्र उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त बा. सु. मरे यांनी केले आहे.









