छत्रपती संभाजीनगर, दि.२२(जिमाका)- सशस्त्र सेना ध्वजनिधी संकलनामागची संकल्पना, जवानांची समर्पित देशसेवा, कर्तव्य, त्याग, बलिदानाप्रती कृतज्ञता व त्यांच्या परिवारांप्रती जबाबदारी समाजात सर्व सामान्यांपर्यंत पोहोचविणे व जागरूकता निर्माण करणे ही आहे. ती आपण तेवढ्याच निष्ठेने पार पाडावी,असे आवाहन विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी बुधवारी (दि.२१) येथे केले.
येथील मौलाना अबुल कलम संशोधन केंद्रात सशस्त्र सेना ध्वजादिनाचे तसेच निधी संकलन शुभारंभ कार्यक्रमाचे आयोजन बुधवारी सायं. सात वा. करण्यात आले. या कार्यक्रमास जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, भा कॅप्टन मोहन रोटे, सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास कार्यालय राजू वाकुडे,इंडो जर्मन टूल रूम चे महाव्यवस्थापक आर.डी. पाटील, वरिष्ठ व्यवस्थापक जे. डी. बागूल, आदी मान्यवर तसेच वीर माता, वीर पिता, वीर पत्नी, माजी सैनिक, सैनिक परिवाराचे सदस्य, शासकीय अधिकारी, सैनिक कल्याण कार्यालयाचे अधिकारी- कर्मचारी आदी उपस्थित होते.
प्रास्ताविक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर सय्यदा फिरासत (निवृत्त) यांनी केले.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यास सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलन वर्ष २०२४-२५ करीता १ कोटी ३४ लक्ष रुपये इतका इष्टांक देण्यात आला होता. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी विविध उपक्रमांच्या माध्यमातून दिलेल्या इष्टांकाच्या १४८ टक्के म्हणजे १ कोटी ९८ लाख ३५ हजार रुपये इतक्या निधीचे संकलन केले.
या उल्लेखनीय निधी संकलनाकरिता छत्रपती संभाजीनगर विभागाला महाराष्ट्रात सर्वात जास्त सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलन करणारा प्रथम विभागाचे स्थान प्राप्त झाल्यामुळे विभगीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार करण्यात आला होता.
कार्यक्रमादरम्यान सर्वप्रथम शहीद सैनिकांना मानवंदना देवून वीरनारी /वीरमाता व अपंग माजी सैनिकांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. तसेच सशस्त्र सेना ध्वजदिन निधीमधून माजी सैनिक व त्यांच्या पाल्यांना कल्याणकारी योजनेद्वारे आर्थिक मदतीचे वाटप करण्यात आले. यामध्ये ७ पाल्यांना विशेष गौरव पुरस्कार सुमारे १ लाख४० हजार रुपये,१५ माजी सैनिकांना ८ लक्ष ३८ हजार २०० रुपयांची आर्थिक मदत प्रदान करण्यात आली. तसेच ज्या शासकीय विभागांनी उत्कृष्ट निधी संकलन केले त्यांचे विभाग प्रमुख तसेच अग्निवीर भरती दरम्यान व माजी सैनिकांच्या कुटुबियांना मदत करणऱ्या स्वयंसेवी संस्थांचे प्रमुखांचा, माजी सैनिक पुनर्नियुक्तांचा सन्मान करण्यात आला. तसेच कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत स्वयं रोजगाराकरीता इंडो जर्मन टूल रूम यांच्या तर्फे सौर उर्जा तंत्रज्ञ प्रशिक्षण पूर्ण केलेल्या माजी सैनिकांचा प्रमाणपत्र देवून सत्कार करण्यात आला. प्रारंभी ध्यास फाउंडेशनच्या नृत्यांगनांनी भारतीय प्राचीन शैलीचे उत्कृष्ट शास्त्रीयनृत्य प्रस्तुत केले







