हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षामध्ये बाळासाहेबांच्या हिंदुत्ववादी विचारांच्या भाजपा महायुतीला मुंबई महापालिका निवडणुकीत मुंबईकरांनी भरभरून मते दिली. भाजपा महायुतीचा महापौर मुंबई महापालिकेत विराजमान होणार आहे. वंदनीय बाळासाहेबांना त्यांच्या जन्मशताब्दी वर्षात हीच खरी श्रद्धांजली आहे, असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांनी शुक्रवारी केले. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करून त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी भाजपा महायुती कटीबद्ध असल्याचे नमूद करीत उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवण्याचे काम करत आहेत असा घणाघात श्री. बन यांनी केला.
यावेळी श्री. बन म्हणाले की, सातत्याने मुस्लीमांचे लांगुलचालन करून, एमआयएम शी छुप्या आघाड्या करून उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांनी बाळासाहेबांच्या विचारांचा अपमान केला. बाळासाहेब ठाकरेंच्या हिंदुत्ववादी विचारांचे खरे वारसदार कोण हे ओळखत मतदारांनी भाजपा – महायुतीला महापालिका निवडणुकीत कौल दिला आहे. मुंबईकरांनी उबाठा गटाला सपशेल नाकारत भाजपा महायुतीचा महापौर होणार यावर शिक्कामोर्तब केले आहे.
वैयक्तिक फायद्यासाठी राज ठाकरे कधीच भूमिका घेत नाहीत असे सांगून श्री. बन म्हणाले की, महापालिका निकाला नंतर राज ठाकरे यांनी कल्याणमध्ये हिंदुत्व आणि विकासासाठी लवचिक भूमिका घेतली आहे. मनसेचा खरा शत्रू कोण हे मुंबई महापालिका निकालानंतर राज यांना कळले आहे. त्यामुळे आगामी काळात राज महायुती सोबत येण्याची शक्यताही श्री. बन यांनी व्यक्त केली .
पर्यावरण मंत्री असताना आदित्य ठाकरेंचा दावोस दौरा पर्यटनासाठी होता का?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दावोसला जाऊन जवळपास 30 लाख कोटीचे सामंजस्य करार केले आहेत, ज्यातून जवळपास 40 लाख रोजगार निर्मिती होणार आहे. एकूण 18 देशांमधून महाराष्ट्र तसेच मुंबईमध्ये भरीव गुंतवणूक होत आहे, जवळपास 83 टक्के करारांमध्ये थेट परकीय गुंतवणूक झाली हे सर्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सक्षम नेतृत्वाचे यश आहे. पर्यटन मंत्री असताना आदित्य ठाकरे यांनी दावोस दौरा पर्यटनासाठी केला होता का ? दावोसला जाऊन आदित्य यांनी कोणासाठी काम केले होते या प्रश्नांची उत्तरे संजय राऊतांनी द्यावीत, असा प्रहारही श्री. बन यांनी केला.
बदलापूर मधील घृणास्पद घटनेचा पोलीस पूर्ण तपास करत आहेत. राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकार दोषींना माफ करत नाही. दोषींना कठोर शासन देऊन बदलापूर प्रकरणातल्या चिमुरडीला न्याय देण्याचे काम गृहखात्याच्या माध्यमातून होईल. बदलापूरच्या आधीच्या घटनेमध्ये देखील दोषीला शिक्षा देण्याचे काम देवेंद्र फडणवीस यांनीच केले होते याची आठवणही त्यांनी करून दिली. महाराष्ट्रातील आधीच्या एकाही गृहमंत्र्यांमध्ये ती धमक नव्हती असेही ते म्हणाले. ज्यांना कोल्हापूर सांभाळता येत नाही त्या सतेज पाटील यांनी कोल्हापूरकरांनी त्यांची काय अवस्था केली याचा आधी विचार करावा आणि मग टीका करावी असा टोला लगावला.
















