छत्रपती संभाजीनगर, दि.२३ : एमजीएम विद्यापीठाच्या फॅकल्टी ऑफ इंटर डिसिप्लिनरी स्टडीज आणि जवाहरलाल नेहरू अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने ‘सस्टेनेबल टेक्नॉलॉजी : फंडामेंटल्स, प्रिंसिपल्स अँड इथिक्स’ या विषयावर आधारित आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचा उद्घाटन समारंभ रुक्मिणी सभागृहात तुळशीला पाणी घालून मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
या उद्घाटन सोहळ्यास एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम, कुलगुरू प्रा.डॉ.विलास सपकाळ, भारतीय फोटोग्रामेटरी आणि रिमोट सेन्सिंग संस्थेचे प्रमुख डॉ.अनिल कुमार, श्री जमनालाल बजाज मेमोरियल लायब्ररी अँड रिसर्च सेंटर वर्धाचे संचालक डॉ.सिबी के.जोसेफ, व्हॅरॉक पॉलिमर्सचे महाव्यवस्थापक गणेश गारखेडकर, गांधी इंटरनॅशनल फ्रांस अँड असोसिएस्ट्स कम्युनिटी ऑफ आर्कचे संस्थापक, लुईस कॅम्पाना, गांधी इंटरनॅशनल फ्रांसचे ख्रिस्तोफ ग्रिग्री, कम्युनिकेशन इपिकचे संचालक अशीरबाद राहा, कम्युनिटी ऑफ आर्कच्या संचालिका मार्गारेट ब्रिजिट हिलर, युनिव्हर्सिटी ऑफ हैदराबादच्या वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ.पूनम सिंगल, कुलसचिव डॉ.आशिष गाडेकर, अधिष्ठाता जॉन चेल्लादुराई, प्राचार्या डॉ.विजया मुसांडे व सर्व संबंधित मान्यवर उपस्थित होते.
उद्घाटनपर भाषणात शास्त्रज्ञ डॉ.अनिल कुमार यांनी ‘सस्टेनेबल अँड इथिकल आर्टिफिशियल इंटेलिजियन्स/मशिन लर्निंग फॉर ऍग्रीकल्चर अनॅलिटिक्स’ या विषयावर उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले, तंत्रज्ञान आता केवळ आर्थिक प्रगतीचे साधन राहिले नसून, मानवी अस्तित्वासाठी ते एक मूलभूत आधारस्तंभ बनले आहे. शाश्वत तंत्रज्ञानाच्या पायाभूत संकल्पना पर्यावरणीय परिणाम कमी करणाऱ्या, संसाधनांचा योग्य व कार्यक्षम वापर करणाऱ्या आणि दीर्घकालीन पर्यावरणीय समतोल राखणाऱ्या साधनांवर, प्रणालींवर व पायाभूत सुविधांवर आधारित आहेत. एमजीएम विद्यापीठातील विविध विभागांना दिलेल्या भेटीदरम्यान येथील प्राध्यापक व विद्यार्थी विज्ञान क्षेत्रात करत असलेले संशोधनात्मक आणि नाविन्यपूर्ण कार्य निश्चितच कौतुकास्पद आहे.
विविध ज्ञानशाखा एकत्रित येऊन संशोधन, नवोपक्रम आणि समाजोपयोगी तंत्रज्ञानाची दिशा निश्चित करणे ही काळाची गरज आहे. या परिषदेत एकूण ५६ संशोधन प्रबंध सादर होणार असून त्यातून शाश्वत विकासासाठी विज्ञानाची भूमिका अधिक ठळक होणार आहे. नऊ राष्ट्रीय तंत्रज्ञान मिशनद्वारे कृत्रिम बुद्धिमत्ता, क्वांटम तंत्रज्ञान, जैवविविधता, इलेक्ट्रिक वाहने, आरोग्य, कचरा व्यवस्थापन, महासागर संशोधन, भाषांतर आणि तळागाळातील नवकल्पना अशा क्षेत्रांमध्ये समाजाभिमुख संशोधनाला चालना दिली जात आहे. ‘वेस्ट टू वेल्थ’ ही संकल्पना या नऊ तंत्रज्ञान मिशनचा एक भाग असून शाश्वत व सर्वसमावेशक विकासासाठी ती मार्गदर्शक ठरणार असल्याचे कुलगुरू प्रा.डॉ.विलास सपकाळ यांनी यावेळी सांगितले.
ही आंतरराष्ट्रीय परिषद शुक्रवार, दिनांक २३ जानेवारी २०२६ ते रविवार, दिनांक २५ जानेवारी २०२६ दरम्यान विद्यापीठात सुरू असणार आहे. यामध्ये एकूण ५६ शोधनिबंध सादर होणार असून यामध्ये जगभरातील तज्ञ मान्यवर आपले विचार मांडणार आहेत. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अधिष्ठाता डॉ. जॉन चेल्लादुराई यांनी केले तर सूत्रसंचालन आणि आभार प्रा. सुखवंत कौर यांनी मानले.
















