छत्रपती संभाजीनगर, दि.२३: डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचा स्वयंसेवक शिवम रामेश्वर सूरडकर याची प्रजासत्ताक दिन सोहळयासाठी अतिथी म्हणून निवड झाली आहे, अशी माहिती रासेयो संचालक डॉ.सोमीनाथ खाडे यांनी दिली.
मोरेश्वर महाविद्यालय, भोकरदन येथील राष्ट्रीय सेवा योजना चा स्वयंयेवक विद्यार्थी शिवम रामेश्वर सुरडकर यानं एन.एस.एस. ेअंतर्गत केलेल्या उत्कृष्ट व उल्लेखनीय कार्याची दखल घेण्यात आली. भारत सरकारच्या क्रीडा मंत्रालयामार्फत २६ जानेवारी रोजी दिल्ली येथे होणा-या प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य सोहळयास विशेष पाहुणे म्हणून उपस्थित राहण्यासाठी निमंत्रण प्राप्त झाले आहे. या गौरवशाली निवडीमुळे शिवम सुरडकर यांचा मा.कुलगुरु डॉ.विजय फुलारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या सत्कारप्रसंगी शिवम यांच्यासह आई दुर्गाबाई व वडील रामेश्वर सुरडकर यांचाही कुलगुरुंनी सन्मान केला व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. शिवम सुरडकर हा २३ जानेवारी रोजी दिल्लीकडे रवाना झाला असून प्रजासत्ताक दिनाच्या राष्ट्रीय सोहळयात सहभागी होणा-या महाराष्ट्रातील केवळ चार विद्यार्थ्यांमध्ये शिवम यांची निवड झाली आहे. यावेळी प्रकुलगुरु डॉ.वाल्मिक सरवदे, कुलसचिव डॉ.प्रशांत अमृतकर, संचालक डॉ.सोमीनाथ खाडे, प्राचार्य डॉ.भगवान डोंगरे, कार्यमाधिकारी डॉ.भगवान सोनुने, डॉ.नारायण लव्हाळे, डॉ.कविता वळवी तसेच शिवम यांचे आई-वडील उपस्थित होते.










