छत्रपती संभाजीनगर, दि. २६ : महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन अँड फॉरेन लँग्वेजेसच्यावतीने ‘भारतीय भाषांमधील भाषांतर क्षेत्रातील करिअरच्या संधी’ या विषयावर करिअर मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आईनस्टाईन सभागृहात आयोजन करण्यात आले होते. केंद्रीय संस्कृत विद्यापीठाच्या (लखनऊ) बौद्ध दर्शन व पाली विभागाचे प्राध्यापक डॉ. प्रफुल्ल गडपाल यांनी प्रमुख वक्ते म्हणून उपस्थितांशी संवाद साधला.
या कार्यक्रमास संचालक डॉ.के.पी.सिंग, डॉ.प्रज्ञा कोनार्डे, डॉ.एम.डी.साजिद आलम, प्राध्यापक, विद्यार्थी व सर्व संबंधित मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ.प्रफुल्ल गडपाल यांनी ‘अनुवाद’ या संकल्पनेचा उगम स्पष्ट करत पाली भाषेतील अर्थछटा तसेच हिंदी, मराठी व इंग्रजी भाषांतील अर्थभेद उदाहरणांसह उलगडून सांगितले. संस्कृत, पाली व प्राकृत या भारतीय ज्ञानपरंपरेच्या मूलभूत भाषा असून त्या केवळ प्राचीन नसून आजही तत्त्वज्ञान, नीतीमूल्ये व संस्कृतीची जिवंत वाहक असल्याचे त्यांनी नमूद केले. भाषांतर करताना केवळ शब्दशः अनुवाद न करता मूळ मजकुराचा आशय, संदर्भ व आत्मा जपण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. विशेषतः तात्त्विक, धार्मिक व साहित्यिक ग्रंथांच्या भाषांतरात ही भूमिका अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
भाषांतर क्षेत्रात शासकीय व भाषा आयोगांतर्गत प्रकल्प, शैक्षणिक व संशोधनात्मक भाषांतर, प्रकाशन संस्था, सांस्कृतिक व शैक्षणिक व्यासपीठे, हस्तलिखिते व दुर्मीळ ग्रंथांचे जतन व भाषांतर, डिजिटल ह्युमॅनिटीज तसेच मौखिक परंपरा व स्थानिक ज्ञानाचे दस्तऐवजीकरण अशा अनेक संधी उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांनी सातत्य, जिज्ञासा व चिकाटी ठेवत या क्षेत्रात काम केले तर त्यांना नक्की यश मिळेल, असे डॉ.प्रफुल्ल गडपाल यांनी यावेळी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तब्बसुम बेग विद्यार्थीनीने केले तर डॉ.साजिद आलम यांनी आभार प्रकट केले.
















