छत्रपती संभाजीनगर, दि. २६ : भारताचा ७७ वा प्रजासत्ताक दिन महात्मा गांधी मिशनच्यावतीने एमजीएम स्टेडियम येथे उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी बजाज ऑटो लिमिटेड छत्रपती संभाजीनगरचे सीएसआर सल्लागार सी.पी.त्रिपाठी यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. श्री.त्रिपाठी यांनी ध्वजारोहण झाल्यानंतर उपस्थितांना मार्गदर्शन केले.
यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधत असताना श्री.सी.पी.त्रिपाठी म्हणाले, आपण वसुधैव कुटुंबकम् या भावनेतून जगणारे भारतीय लोक आहोत. आपले संविधान हे केवळ कायद्यांचे पुस्तक नसून ते आपल्या लोकशाही जीवनाचे मार्गदर्शक आहे. त्याच्या मूल्यांवर आधारलेले आपण आज एक स्वतंत्र, स्वायत्त आणि समृद्ध राष्ट्र म्हणून अभिमानाने उभे आहोत. विकसित भारताचे स्वप्न आपण सर्वांनी मिळून साकार करूया, या विश्वासासह सर्वांना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!
पथ संचलनातील उत्कृष्ट महाविद्यालय पथकाच्या संघाला आणि देखावे सादरीकरण केलेल्या प्रथम तीन संघांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. या प्रजासत्ताक दिन सोहळ्यास कुलपती अंकुशराव कदम, कुलगुरू डॉ.विलास सपकाळ, एमजीएम परिवारातील सर्व सदस्य, सर्व अधिष्ठाता, संचालक, प्राचार्य, विभागप्रमुख, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी व सर्व संबंधित उपस्थित होते.
यावर्षी शैक्षणिक मूल्य, संविधानाची भावना, राष्ट्रीय एकात्मता आणि समकालीन भारताची सांस्कृतिक विविधता या संकल्पनांवर आधारित प्रजासत्ताक दिनाची थीम होती. एमजीएमच्या विविध संस्थेतील विद्यार्थ्यांनी या आधारावर विविध देखावे सादर केले. यावेळी देशभक्तिपर गीते व वृंदगान क्लोवर डेल स्कूल आणि फर्स्ट स्टेप स्कूल शाळेतील विद्यार्थी आणि गायक राहुल खरे व भक्ती बनवस्कर यांच्या टीम यांनी सादर केले.
आज झालेल्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात अन्वेषण २०२६ स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावलेल्या एमजीएम विद्यापीठाच्या तीन संघांना आणि जवाहरलाल नेहरू अभियांत्रिकी महाविद्यालयातील कृषि विमान संघाने ‘निडर २०२६’ स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यशश्री मुळे आणि डॉ.गौतमी खडके यांनी केले.
















