दिनांक २७ जानेवारी २०२७, पुणे:-
देशाच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनाच्या मंगल पर्वावर विद्यानगर येथील ‘चलवादी शिक्षण संस्थे’च्या प्रांगणात देशभक्तीचा अभूतपूर्व सोहळा रंगला. सोहळ्यात पुणे इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी आपल्या सादरीकरणातून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमात पुणे महानगर पालिका शिक्षण मंडळाचे माजी सदस्य बाळासाहेब जानराव प्रमुख वक्ते तर, माजी नगरसेवक डॉ.हुलगेश चलवादी, शाळेच्या उपाध्यक्ष ॲड.रेणुका चलवादी, सुधीर वाघमोडे, स्वप्नील शिर्के, योगगुरू नामदेव इंगळे, सुरेखा जानराव आणि सायली शिंदे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
“भारतीय संविधान हे केवळ कागदावरचे नियम नाहीत, तर तो या देशाचा आत्मा आहे.हा आत्मा जिवंत ठेवण्यासाठी आणि एक सुजाण नागरिक घडवण्यासाठी प्राथमिक शिक्षणापासूनच मुलांच्या मनात संविधानाचे बाळकडू रुजवले पाहिजे.”, असे प्रतिपादन ध्वजवंदनेनंतर उपस्थितांना संबोधित करतांना बाळासाहेब जानराव यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आणि संस्थेचे चेअरमन डॉ.हुलगेश चलवादी यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करताना म्हटले की, “आज मुलांच्या डोळ्यांत जी चमक आणि आवाजात जो जोश दिसला, तो पाहून खात्री पटली की भारताचे भविष्य सुरक्षित हातांत आहे.” त्यांनी विद्यार्थ्यांच्या देशप्रेमी सादरीकरणाला मनापासून दाद दिली.
कार्यक्रमाची रंगत खऱ्या अर्थाने वाढवली ती शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी. देशभक्तीपर गीते, समूहगानातील सूर आणि समूह नृत्यातील ताल यांनी उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांच्या शिस्तबद्ध कवायत संचालनाने जणू भारतीय सैन्याच्या सामर्थ्याची छोटी झलकच दाखवून दिली. त्यानंतर सादर झालेले योगा, सूर्यनमस्कार आणि जिम्नॅस्टिकची चित्तथरारक प्रात्यक्षिकांनी उपस्थितांचे लक्ष वेधले.
मैदानावरील खेळांत घाम गाळून यश मिळवणाऱ्या १४ वर्षांखालील खेळाडूंचा (फुटबॉल, खो-खो, क्रिकेट) आणि चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.कार्यक्रमाचे अत्यंत ओघवते आणि प्रभावी सूत्रसंचालन अर्पिता रथ यांनी केले, तर उपस्थितांचे आभार मानताना स्मिता लोंढे यांनी या अविस्मरणीय सोहळ्याची सांगता केली.
















