३० जानेवारीला उपोषणाचा दिला इशारा…!
नांदेड : सध्या हिवाळ्याचे दिवस असल्याने मुलांसह ज्येष्ठ नागरिक आरोग्याच्या तंदुरुस्तीसाठी माॅर्निग वाॅकला घराबाहेर पडत आहेत. चैतन्यनगर ते सांगवी या विमानतळ रस्त्यालगत असलेल्या गार्डन मध्ये गर्दी होत आहे. परंतु, या गार्डनच्या देखभालीची मोठी गैरसोय होत आहे. सहा महिन्यापुर्वीच बांधन्यात आलेला पदपथ पुर्ण दबला आहे. टेकडी खड्डयातून चालतांना नागरिकांना त्रास होत आहे. हि गोष्ट लक्षात घेऊन माॅर्निंग वाॅक ग्रुपने एकत्रित येऊन येत्या ३० जानेवारी रोजी लाक्षणिक उपोषण करण्याचा इशारा बुधवारी (दि.२१) कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग नांदेड यांच्यासह जिल्हाधिकारी, पोलिस अधिक्षक, अधिक्षक अभियंता मुख्य अभियंता यांना एका निवेदनाद्वारे दिला आहे.
चैतन्यनगर ते सांगवी रस्त्यालगत असलेल्या विमानतळ भिंतीला खेटून उद्यान तयार करण्यात आले आहे. येथे दररोज शेकडो नागरिक माॅर्निंग वाॅकसाठी येतात. परंतु, गार्डनची देखभाल होत नसल्याने जागोजागी कचऱ्याचे ढीग, दारुच्या बाटल्या निदर्शनास येत असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होताना दिसून येत आहे.
बुधवारी सकाळी पत्रकार आनंद कल्याणकर यांच्या नेतृत्वाखाली माॅर्निंग वाॅक ग्रूपने गार्डनच्या विकासासाठी एकत्रित येवून एक दिवसीय लाक्षणिक उपोषणाचा निर्णय घेतला आहे.
विकसित होत असलेल्या या गार्डन मध्ये मधुमेह, रक्तदाब, पचनविकार, वजन जास्त असलेले रूग्ण येत आहेत. त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी हे उद्यान सुरक्षित, स्वच्छ व आरोग्यदायी ठेवणे अत्यंत आवश्यक असल्याचे आनंद कल्याणकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिलेल्या निेवेदनात म्हटले आहे.
बुधवारी झालेल्या बैठकीस आनंद कल्याणकर यांच्यासह साहित्यिक शेषराव मोरे, जगदिश कदम, सेवा निवृत्त शिक्षणाधिकारी अशोकराव पाईकराव, निव़ृत्तीराव कोकाटे, प्रा. आत्माराम चव्हाण, श्री. दाडगे, सूर्यवंशी तळणीकर, श्री. कुलकर्णी, प्रा. मंगनाळे आदींसह अनेक सदस्य उपस्थित होते.
निवेदनाव्दारे पुढील मागण्या करण्यात आल्या आहेत. उद्यानातील पामवृक्ष मोडली असून त्या जागी उंच वाढणाऱ्या वृक्षांची लागवड करावी, गार्डन मधील हिरवळ, शोभेची झुडप सुकत आहेत. त्यांना सिंचन करावे, हिरवळीवर किटकनाशक फवारणी करून उद्यान टवटवीत ठेवावे, तणनियंत्रण करावे, गार्डनमध्ये प्रवेशासाठी नियम करावा, संरक्षक भिंत बांधण्यात यावी, उद्यानात पाळीव प्राणी आणण्यास प्रतिबंध करावा, नियमित साफसफाई करावी, जागोजागी कचराकुंड्या बसवाव्यात, पुरुष व महिलांसाठी शौचालय उभारावेत ,सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, दिवे लावावेत अशा एकूण २५ मागण्यांचा निवेदनात समावेश करण्यात आला आहे.














