दिनांक २५ जानेवारी २०२६, पुणे:- घटनाकार डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या मतदानाच्या हक्काचा नागरिकांनी योग्य आणि जबाबदारीने वापर केला, तर निश्चितच योग्य प्रतिनिधी निवडून येऊ शकतात आणि त्यातून लोकशाही अधिक बळकट होईल, असे प्रतिपादन पुणे इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या उपाध्यक्षा, युवा नेत्या ऍड.रेणुकाताई चलवादी यांनी रविवारी केले. ९६ व्या राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधून पुणे इंटरनॅशनल स्कूल येथे विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, या कार्यक्रमात ऍड.रेणुकाताई बोलत होत्या.
मतदान हा केवळ अधिकार नसून तो लोकशाहीचा कणा आहे. देशातील नागरिकांनी मतदानाच्या माध्यमातून आपल्या भविष्यासाठी योग्य प्रतिनिधी निवडणे अत्यंत महत्त्वाचे आहे. “मतदानासमान दुसरे काहीच नाही, मी नक्कीच मतदान करणार” ही यावर्षीच्या मतदार दिनाची संकल्पना प्रत्येक मतदाराला प्रेरणा देणारी आहे.ही संकल्पना मतदारांना समर्पित असून, मतदानातून मिळणाऱ्या सामर्थ्याच्या जोरावर निवडणूक प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेण्याची भावना व आकांक्षा यातून व्यक्त होते, असे ऍड.रेणुकाताई म्हणाल्या.
निवडणूक प्रक्रियेचा उत्सव आणि समावेशकता दर्शविण्यासाठी तयार करण्यात आलेल्या बोधचिन्हाचेही त्यांनी कौतुक केले. बोधचिन्हातील पार्श्वभूमीवरील अशोक चक्र हे जगातील सर्वात मोठ्या लोकशाही व्यवस्थेचे प्रतीक असून, शाई लावलेल्या बोटाची प्रतिमा देशातील प्रत्येक मतदाराचा सहभाग दर्शविते.
बोधचिन्हातील ‘बरोबर’ची खूण ही मतदारांनी माहितीपूर्ण आणि विवेकी निर्णय घेण्याच्या प्रक्रियेचे निदर्शक असल्याचे ऍड. रेणुकाताई म्हणाल्या.कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता, लोकशाही मूल्ये जपत मोठ्या प्रमाणावर मतदान करावे आणि देशाच्या विकासात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.














