नाशिक (प्रतिनिधी) : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या ‘संवाद’ पत्रिकेच्या वतीने विद्यापीठाच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी ‘अनोखी कल्पक जाहिरात निर्मिती स्पर्धा’ आयोजित करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांमधील कल्पकता आणि सृजनशीलतेला वाव देणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश असून येत्या दिनांक २३ फेब्रुवारी २०२६ पर्यंत विद्यार्थ्यांना या स्पर्धेत भाग घेता येईल.
विद्यापीठाचे मा. कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या स्पर्धेसाठी ‘ज्ञानगंगा घरोघरी – यशवाणी कानोकानी’, ‘मुक्त विद्यापीठातील शिक्षण – विकासाचे लक्षण’, ‘प्लास्टिक हटवा – पर्यावरण वाचवा’ व ‘मुक्त विद्यापीठ – ‘संवाद’ पत्रिका’ असे चार विषय आहेत. त्यापैकी एका विषयावर आधारित ए फोर आकारातील जाहिरात ही आकर्षक मजकूर, लक्षवेधी चित्र आणि विषयाला सुसंगत घोषवाक्यासह असावी. तसेच स्पर्धकांनी ही जाहिरात बहुरंगी भित्तीपत्रक (पोस्टर) स्वरूपात तयार करून पीडीएफ, जेपीईजी किंवा पीएनजी स्वरूपात paikrao_vk@ycmou.digitaluniversity.ac या मेल आयडीवर पाठवावी. सोबत स्पर्धकाने आपले पूर्ण नाव, शिक्षणक्रमाचे नाव, अभ्यासकेंद्राचे नाव, केंद्र संकेतांक आणि कायम नोंदणी क्रमांक नमूद करणे आवश्यक आहे. गुणवत्तापूर्ण ठरणाऱ्या प्रथम पाच जाहिरातींना विशेष पारितोषिक, प्रमाणपत्र आणि ग्रंथ देऊन गौरविण्यात येईल. तसेच सहभागी होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र दिले जाणार आहे. त्यामुळे विद्यापीठाच्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवावा, असे आवाहन विद्यापीठ पत्रिका ‘संवाद’चे कार्यकारी संपादक प्रा. विजयकुमार पाईकराव यांनी केले आहे.














