भारताची आघाडीची हिंदी जनरल एन्टरटेन्मेंट चॅनल सोनी सब घेऊन येत आहे- ‘हुई गुम यादें – एक डॉक्टर, दो जिंदगियां’. जगभरात वाखाणल्या गेलेल्या डीओसी या इटालियन मेडिकल ड्रामाचे हे भारतीय रूपांतर आहे. या मालिकेचे अनेक देशांत, तेथील स्थानिक भाषांमध्ये रूपांतर झाले आहे. जीवन, प्रेम आणि ओळख याबाबतीत दुसऱ्या संधीच्या विषयावर बेतलेल्या या मालिकेत डॉ. देव (इकबाल खान) या बुद्धिमान डॉक्टरची कहाणी सांगितली आहे. एका अपघातात आठ वर्षांची स्मृती गमावल्यानंतर डॉ. देव नव्याने आपले विश्व पुन्हा उभारण्याचा प्रयत्न करत आहे.
या कथानकाला अधिक सखोलता देणारी एक व्यक्तिरेखा आहे, सृष्टीची. गुणी अभिनेत्री एकता कौल ही महत्त्वपूर्ण आणि दमदार भूमिका करत आहे. सृष्टी ही डॉ. देवची पूर्वीची पत्नी आहे. एके काळी स्वतः डॉक्टर असलेल्या सृष्टीने आपल्या मुलांच्या संगोपनासाठी वैद्यकीय प्रॅक्टिस सोडून हॉस्पिटलची अॅड्मिनिस्ट्रेशनची जबाबदारी सांभाळली आहे. याच दवाखान्यात डॉ. देव काम करत आहे. अनेक वर्षे सृष्टी असे मानत होती की, त्यांचा विवाह विच्छेद होण्याचे कारण डॉ. देव होता. त्यांचा सहा वर्षांचा मुलगा ध्रुव याच्या दुर्दैवी निधनानंतर त्याच्या व्यक्तिमत्त्वात झालेला बदल, त्याचा कठोरपणा, तुटकपणा आणि उद्धटपणा यामुळे त्यांच्या नात्यात दुरावा आला होता. मात्र देवची स्मृती गेल्यानंतर आता तिच्या समोर असलेला देव हळवा, समर्पित आणि तिच्या प्रेमात वेडा असलेला देव आहे. त्यामुळे तिच्या मनात भूतकाळातील जखमा आणि प्रेमाला दुसरी संधी देण्याबाबत आंतरिक संघर्ष चालू आहे.
ही मालिका आणि त्यातील आपल्या भूमिकेविषयी बोलताना एकता कौल म्हणाली, “यादें हा केवळ मेडिकल ड्रामा किंवा स्मृती गेल्याची गोष्ट नाही. आपल्या ओळखीचे सर्व काही अचानक हरपल्यानंतर हा स्वतःचा नव्याने शोध घेण्याचा प्रवास आहे. मुळात ही दुसरी संधी देण्याची कथा आहे. जीवन, प्रेम, नाती आणि उद्देश यांना दुसरी संधी देण्याची गोष्ट. मला जेव्हा या भूमिकेचा प्रस्ताव मिळाला, तेव्हा मी खूप खुश झाले, कारण मला अशी भूमिका करायची होती, ज्यात आव्हान असेल, जी मला हलवून सोडेल आणि मला अभिनयकला का आवडते याचे स्मरण देईल. वैयक्तिक आणि सर्जनशील स्तरावर माझी वाढ झाली आहे, आणि आता परतण्यासाठी सृष्टी ही व्यक्तिरेखा मला अगदी योग्य वाटली, कारण ती एक कणखर, बुद्धिमान आणि भावनाप्रधान स्त्री आहे.”
















