छत्रपती संभाजीनगर,दि.२५ : महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या मूलभूत आणि उपयोजित विज्ञान शाखेअंतर्गत रसायनशास्त्र विभागाच्या वतीने मेटल ऑर्गॅनिक फ्रेमवर्क्स (एमओएफ्स) या नोबेल पारितोषिकप्राप्त विषयावर विशेष तज्ज्ञ व्याख्यानाचे दूरदृश्यप्रणालीमार्फत आयोजन करण्यात आले होते. या विशेष व्याख्यानासाठी तैवान येथील युआन झे विद्यापीठाचे प्राध्यापक तथा आंतरराष्ट्रीय किर्तीचे संशोधक डॉ.बाबासाहेब मतसागर यांनी विषय तज्ञ व व्याख्याते म्हणून उपस्थितांशी संवाद साधला.
मेटल ऑर्गॅनिक फ्रेमवर्क्स या संशोधन क्षेत्राला रसायनशास्त्रातील २०२५ चा नोबेल पुरस्कार प्राप्त झाल्याच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना व संशोधकांना जागतिक स्तरावरील अद्ययावत संशोधनाची माहिती मिळावी, हा या व्याख्यानामागील प्रमुख उद्देश होता. या कार्यक्रमासाठी एकूण ९४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यामध्ये २३ पदवी, ५१ पदव्युत्तर व २० पीएच.डी. संशोधकांचा समावेश होता.
डॉ. बाबासाहेब मतसागर यांनी आपल्या व्याख्यानात मेटल ऑर्गॅनिक फ्रेमवर्क्स’ची विशिष्ट उपयोगांसाठी रचना, थ्री-डी प्रिंटेड मॉडेल्स, एमओएफ्सचे संश्लेषण व विविध औद्योगिक व संशोधनात्मक उपयोग याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच बायोमास ट्रान्सफॉर्मेशन प्रक्रियेसाठी एमओएफ-आधारित मेटल नॅनोकॅटलिस्ट्स कसे उपयुक्त ठरतात, यावर विशेष भर देण्यात आला. फरफ्युराल पासून ट्राय-एम डेरिव्हेटिव्हज निर्मिती व त्यांचा इलेक्ट्रोक्रोमिक मटेरियल म्हणून होणारा उपयोग याबाबत सखोल माहिती देण्यात आली. यासोबतच कंटिन्युअस फ्लो रिऍक्टरच्या माध्यमातून एमओएफ्सचे मोठ्या प्रमाणावर संश्लेषण कसे करता येते, याचेही सविस्तर विवेचन करण्यात आले.
या विशेष व्याख्यानास अधिष्ठाता डॉ.प्राप्ती देशमुख, विभागप्रमुख डॉ.सूर्यकांत सपकाळ, डॉ.गणेश पवार, डॉ. बाळाजी मुळीक, प्राध्यापक, विद्यार्थी व सर्व संबंधित मान्यवर उपस्थित होते. हे व्याख्यान विद्यार्थ्यांसह प्राध्यापकांसाठी अत्यंत माहितीपूर्ण व प्रेरणादायी ठरले. जागतिक पातळीवरील संशोधन संधी, आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि शाश्वत रासायनिक परिवर्तनाच्या क्षेत्रातील नव्या शक्यता यांची जाणीव या व्याख्यानातून निर्माण झाली.














