छत्रपती संभाजीनगर, दि.२५ : महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या डॉ.जी.वाय.पाथ्रीकर कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये ‘होप-बार्कलेज लाइफ स्किल प्रोग्राम : रोजगारक्षमता आणि व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षण’ हा अल्पकालीन प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.
हा कार्यक्रम होप फाउंडेशन यांच्या सहकार्याने व बार्कलेज यांच्या सीएसआर उपक्रमांतर्गत आयोजित करण्यात आला होता. या प्रशिक्षणाचा उद्देश विद्यार्थ्यांच्या रोजगारक्षमतेत वाढ करणे व व्यक्तिमत्व विकास साधणे हा होता. कार्यक्रमात एकूण ८० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
या पाच दिवसीय प्रशिक्षणात विद्यार्थ्यांना प्रभावी संवाद कौशल्य, भावनिक बुद्धिमत्ता, स्व:प्रेरणा, ताणतणाव व्यवस्थापन, वेळ व्यवस्थापन, मुलाखत कौशल्य, ध्येय निर्धारण, संघर्ष व्यवस्थापन, करिअर विकास तसेच रस्ते सुरक्षा नियम व कायदे याबाबत मार्गदर्शन मिळाले. हे सर्व कौशल्ये विद्यार्थ्यांना उद्योगसज्ज बनवण्यासाठी उपयुक्त ठरली.
कार्यक्रमाचे विषय तज्ञ म्हणून होप फाउंडेशनचे श्री. सॅम्युअल पाटोले यांनी विविध उपक्रमांद्वारे पाच दिवस प्रशिक्षण दिले. या प्रसंगी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.प्राप्ती देशमुख यांनी विद्यार्थ्यांचे तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतलेल्या आयोजन समिती, अध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी समन्वयक डॉ.भारत नाईकनवरे आणि श्री.आशिष भालेराव यांनी परिश्रम घेतले.
















