आज २६ जानेवारी २०२६,भारताचा ७७ वा प्रजासत्ताक दिन.यानिमित्ताने महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री तसेच नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी नाशिक येथील पोलीस परेड ग्राउंडवर झेंडा वंदन केल्यानंतर केलेल्या संपूर्ण भाषणात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे एकदाही नाव घेतले नाही, त्यामूळे तिथे बंदोबस्ताला असलेल्या वन विभागाच्या कर्मचारी माधवीताई जाधव कानात जीव आणून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव ऐकण्यास अधीर झाल्या होत्या, पण मंत्री गिरीश महाजन यांनी संपूर्ण भाषणात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे एकदाही नाव घेतले नाही, भाषण संपेपर्यंत कोणालाही काहीच आक्षेप नव्हता. पण बंदोबस्ताला असलेल्या माधवीताई पेटून उठल्या आणि त्यांनी मैदानात धाव घेऊन जोरजोरात मंत्री गिरीज महाजन यांचा निषेध करायला सुरुवात केली,तेंव्हा उपस्थितांना कळले की,गिरीश महाजन यांनी संपूर्ण भाषणामध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेतले नाही.
माधवीताईंनी वातावरण गंभीर केले.त्या सरकारी नोकरीत असूनही त्यांनी नोकरीची पर्वा केली नाही, नोकरी गेली तर वाळूच्या गाड्या भरेल,मातीकाम करेल,सस्पेंड केले तरी चालेल पण बाबासाहेबांचा अपमान सहन करणार नाही,ज्या बाबासाहेबांनी महिलांच्यासाठी आणलेले हिंदू कोड बिल संसदेत चर्चेत घेतले नसल्याने मंत्रिपदाचा राजीनामा दिला,ज्या बाबासाहेबांनी घटना लिहून सर्वांना समानाधिकार दिला, महिलांना सन्मान दिला,ज्यांच्यामुळे मी या पदावर आहे त्या बाबासाहेबांचे नाव मंत्री महाजनांनी मुद्दाम घेतले नाही,नामोल्लेख टाळून बाबासाहेबांची बदनामी केली,असा आरोप माधवीताईंनी केला आहे.जोपर्यंत गिरीश महाजन यांच्यावर अट्रोसिटी दाखल होत नाही,तोपर्यंत त्यांनी उपोषण सुरू केले आहे.याला म्हणतात धाडस आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील निष्ठा* नाहीतर आताच निवडणुका झाल्या. त्या निवडणुकीत भीमाच्या लेकींचा (सुज्ञ लेकींचा अपवाद वगळता) वेगळाच अनुभव आला. तो अनुभव डॉ.रजनीकांत गायकवाड यांनी मांडला आहे.त्यांच्या मते निवडणुकीच्या दिवशी भीमाच्या लेकी हजार पाचशे घेतल्याशिवाय निवडणुकीला बाहेर पडत नव्हत्या.मतदानाची वेळ संपत आली होती,चार पाच वाजेपर्यंत भिमाच्या लेकी मतदानाला बाहेर पडत नव्हत्या.शेवटी ज्यांनी मतदानाचे पैसे दिले त्यांना मतदान करायला भीमाच्या लेकी बाहेर पडल्या.विशेष म्हणजे भिमाच्या लेकींनी पाहिले नाही की,आपण जातीयवादी पक्षांच्या उमेदवारांकडून पैसे घेऊन त्यांच्या खाल्लेल्या मिठाला जागून त्यांनाच मतं देत आहोत.हजारपाचशे किती दिवस पुरणार आहेत? ते तर त्याच दिवशी किंवा निवडणुकीचा निकाल लागण्या अगोदरच संपलेही असतील.त्यांच्या मतांमुळे जातीयवादी पक्षांचे उमेदवार निवडून आले.ज्या पक्षांना संपवण्यासाठी आंबेडकरी विचारांचे नेते जीवाचे रान करत असतात. त्यांच्या भाषणाला भीमाच्या लेकी अंतकरणापासून दाद देत असतात.तिथल्यातिथे निर्णय घेतात,की काही झाले तरी आंबेडकरी समाजाच्या उमेदवारालाच मत देणार.पण सभा संपली की काही दिवसात तो जोशही संपून जातो, आणि ऐन निवडणुकीत या माझ्या माय माऊल्या (काही अपवाद वगळता) मतदानासाठी पैसे घ्यायला थांबून राहतात.अगदी आंबेडकरी अनुयायी असलेल्या उमेदवारांकडून सुद्धा.
युरोपमध्ये मतदानाचा अधिकार फक्त अमीर उमरावानांच होता,हळू हळू,श्रीमंतांना मतदानाचा अधिकार देण्यात आला,त्यानंतर जमीन मालकांना अधिकार देण्यात आला,कित्येक वर्षे गुलाम आणि शूद्रांना (काळ्यांना) मतदानाचा अधिकार नव्हता.महिलांना तर कित्येक वर्षे मतदानाच्या अधिकारासाठी वाट पहावी लागली.एमेलीन पॅनखर्स्ट या महिलेला आंदोलन करावे लागले.१९०३ मध्ये त्यांनी ‘विमेन्स सोशल अँड पोलिटिकल युनियन’ काढली .महिलांची संघटना बांधून त्यांनी मतदानाच्या अधिकारासाठी लढाई सुरू केली.मतदानाचा हक्क मिळावा म्हणून भव्य मोर्चे काढले.१९०८ मध्ये महिलांचा लाखोंचा मोर्चा संसदेवर काढला.त्यांना जेलमध्ये जावे लागले.त्यांनी जेलमध्ये आंदोलन सुरू केले,उपोषण केले.सततच्या संघर्षामुळे १९१८ मध्ये ३० वर्षे वयावरील मालमत्ताधारक महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला.सर्व महिलांना मतदानाचा अधिकार मिळण्यासाठी १९२८ साल उजाडावे लागले.पण भारतात घटनाकार डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी कलमाची ताकद दाखवली आणि प्रौढ स्त्री पुरुषांना मतदानाचा अधिकार दिला.मतदानासाठी त्यांनी गरीब श्रीमंत भेद केला नाही.टाटा बिर्ला यांच्या मताची किंमत आणि गरीबाच्या मताची किंमत ही सारखीच ठरली. ज्यांना चार दिवस खायला भेटत नाही,ज्यांना अस्पृश्य म्हणून हिनवले जाते,त्यांच्या मताची किंमत ही अति श्रीमंत लोकांच्या बरोबरीची करून ठेवली.बाबासाहेबांचे हे किती मोठे उपकार संपूर्ण भारतावर आहेत.सतत बाबासाहेबांचे नाव मुखात असणारे बाबासाहेबांचे अनुयायी जेंव्हा पैसे घेतल्याशिवाय मतदानाला बाहेर पडत नाहीत,तेव्हा मन उद्विग्न होते.आज बाबासाहेब असते तर…
सतत जातीयवादी पक्षांना मातीत गाडण्याची भाषा करणारे निवडणूकीच्या दिवशी भान विसरून जातीयवादी पक्षाच्या उमेदवारांकडून हजार पाचशे घेऊन मतदान कसे करतात, हेच कळत नाही.
आज भारताचे चित्र काय आहे?या चित्राला आपणच कारणीभूत नाही का? याचा विचार होणार आहे का? पैसे घेऊन मतदान करणारे अडाणी किंवा गरीबच नाहीत तर सधन आणि सुशिक्षित लोकही जेंव्हा पैसे घेऊन मतदान करतात तेंव्हा त्यांना निवडून आलेल्या उमेदवाराला बोलण्याचा ते अधिकार गमावत नाहीत का? याचाही विचार झाला पाहिजे.असेच होत राहिले तर फक्त श्रीमंत लोकच निवडणूक जिंकतील गरीब पण काम करणाऱ्यांना कोणी विचारणार नाही,त्यांनी निवडणूक सुद्धा लढवू नये,अशीच परिस्थिती आज सगळीकडे दिसते.सधन उमेदवार पैशाच्या जोरावर निवडणूक जिंकतो तर सतत पाच लोकांच्या कामी येणारा पण असधन उमेदवार मतदारांना द्यायला पैसे नसल्यामुळे अपयशी होतो.निवडून आलेले सधन उमेदवार पाच वर्षे लक्ष देत नाहीत पाच वर्षांनंतर मतदारांना पैसे वाटून पुन्हा निवडून येतात. काम करणारे पुन्हा अपयशी होतात.
आज डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे भाषणात नाव घेतले नाही म्हणून नोकरीची पर्वा न करता मंत्र्यांचा निषेध करून मंत्र्याची मानसिकता दाखवणाऱ्या माधवीताईंनी पैसे घेऊन मतदान करणाऱ्यांच्या खणखणीत कानाखाली ठेवून दिली आहे.कुठे बाबासाहेबांसाठी हजारो रुपयांची रुबाबदार नोकरी सोडून मंत्र्यांचा निषेध करणारी माधवीताई जाधव आणि कुठे हजार पाचशेसाठी आपल्याच आंबेडकरवादी उमेदवाराच्या विरोधात मतदान करणाऱ्या बा भीमाच्या लेकी.फक्त लेकीच नाहीत तर लेकंसुद्धा समाजाला गद्दार होताना पाहून बा भीमाच्या लेकरांना मतदान करताना पैसे मागतात.आपल्या मतांची आणि ज्या बिचाऱ्यांना माहीतही नसेल अशा अनभिज्ञ मतदारांची बोली लावतात.’आमच्याकडे इतकी मते आहेत,किती द्याल,लवकर सांगा, नाहीतर दुसरा (जातीयवादी पक्षाचा) उमेदवार इतके इतके पैसे देत आहे,त्याच्यापेक्षा जास्त द्याल तर तुमचा विचार करू अन्यथा जातीयवादी उमेदवाराचे दरवाजे उघडे आहेतच.’काय बोलणार या भीम अनुयायांना ?. ते पैसे किती दिवस पुरतील? पैशाच्या जोरावर निवडून आलेले जातीयवादी उमेदवार पाच वर्षे उभे तरी करतील का? हजार पाचशेसाठी जातीयवादी उमेदवारांना पाच वर्षांसाठी निवडून देण्यासाठी मतदान करताना बोट कसे आखडत नाही, हेच कळत नाही.
आज समाजमाध्यमांवर मोठमोठया पोस्ट करून मंत्री महाजनांचा माज उतरवण्याची भाषा करणारे कालच्या मतदानात मतांचा सौदा करत होते,हे ते सफसेल विसरले आहेत.या अशा लोकांमुळेच आंबेडकरी विचारांचे कमी उमेदवार निवडून येतात.हेच तोडपाणी करणारे लोक जेंव्हा संसदेवर,विधानभवनावर निळा झेंडा लावण्याचे स्वप्न बघतात तेंव्हा हसावे की रडावे, काहीच सुचत नाही.
कडू डोस आंबेडकरी विचारांच्या नेत्यांचे भाषण हे तितक्यापूरते ऐकू नका, तर शेवटपर्यंत त्यांच्या विचारांशी बांधील राहा.तुमच्या टाळ्या मिळाव्यात म्हणून त्यांचे भाषण नसते,हे लक्षात ठेवा.अजूनही जिल्हापरिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका बाकी आहेत,तिथे तरी माधुरीताई जाधव यांच्यांसारखा कणखरपणा दाखवा,हजार पाचशेला लाथ मारून आपले लोक निवडून द्या.तरच जयभीम म्हणा.अन्यथा…..
















