भारतीय राज्यघटनेच्या बळावरच देश कणखरपणे उभा: प्रो. डॉ. गायकवाड. महासत्तेचे स्वप्न साकार करण्यासाठी युगपुरुष व थोर महात्म्यांचे विचारच आवश्यक: प्रा. प्रदीप रोडे
छत्रपती संभाजीनगर येथील मॉडर्न महाविद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा छत्रपती संभाजीनगर दिनांक २७ (प्रतिनिधी) असंख्य स्वातंत्र्य सेनानींनी व नागरिकांनी आपल्या प्राणांची आहुती देऊन भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून जगात सर्वश्रेष्ठ ठरणारी लोकशाही भारताला दिली. राज्यघटनेच्या बळावरच आजचा समृद्ध भारत देश कणखरपणे उभा आहे. असे मत प्रो.डॉ. कॅप्टन सुरेश गायकवाड यांनी व्यक्त केले तर राष्ट्रीय विकास म्हणजे अब्जावधी रुपयांच्या घोषणांचा व आश्वासनांचा पाऊस आणि विद्युत रोषणाईचा लखलखाट नव्हे तर स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या त्रिसूत्री मध्येच राष्ट्रीय विकास दडलेला आहे. भारताला महासत्ताक बनविण्यासाठी शाहू, फुले, आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार आत्मसात केले तरच भारताचे महासत्तेचे स्वप्न साकार होऊ शकेल असे मत तुलशी शिक्षण समूहाचे प्रमुख प्रा. प्रदीप रोडे यांनी व्यक्त केले.
छत्रपती संभाजीनगर येथील मॉडर्न महाविद्यालयाच्या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित केलेल्या समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून प्रो. डॉ. कॅप्टन सुरेश गायकवाड हे बोलत होते तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तुलशी शिक्षण समूहाचे प्रमुख प्रा. प्रदीप रोडे होते. यावेळी व्यासपीठावर प्राचार्य डॉ. नामदेव सानप यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रारंभी ७७व्या भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त मान्यवरांच्या हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व प्रमुख पाहुणे प्रो. डॉ. सुरेश गायकवाड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तद्नंतर आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलतांना प्रो. डॉ. सुरेश गायकवाड म्हणाले की, भारतीय राज्यघटना नागरिकांनी आत्मसात करावी यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक शिक्षणाचा आग्रह धरला तळागाळातील वंचित, मागास घटकांच्या शिक्षणासाठी शाळा महाविद्यालये उघडली. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे ते जो कोणी प्राशन करेल ती व्यक्ती आपल्या न्याय हक्कासाठी गुरगुरल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना होता. शिक्षणाच्या माध्यमातून आपल्या अधिकाराबरोबरच राष्ट्रीय कर्तव्याची जाणीव नागरिकांना होईल. सामाजिक न्याय, समता व स्वातंत्र्याची भावना वाढीस लागू शकते असा ठाम विश्वास त्यांचा होता. भारतीय राज्यघटनेच्या बळावरच आज भारत एक समर्थ राष्ट्र म्हणून उभा आहे. नव्या पिढीने भारतीय राज्यघटनेचा विचार आत्मसात करण्याची आवश्यकता आहे असेही डॉ. गायकवाड यांनी म्हटले. कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करताना तुलशी शिक्षण समूहाचे प्रमुख प्रा. प्रदीप रोडे म्हणाले की, असंख्य स्वातंत्र्य सैनिकांच्या व नागरिकांच्या बलिदानातून भारताला स्वातंत्र्य मिळाले आहे, ही गोष्ट लक्षात घेऊन भारतीय राज्यघटनेत सामान्य नागरिकांना मताचा अमूल्य अधिकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रदान केलाआहे. मतदानाचे महत्त्व लक्षात घेऊन नागरिकांनी हा देश लोकशाहीच्या माध्यमातून स्वातंत्र्य, समता आणि न्याय यात्रिसूत्रीवर विश्वास असणाऱ्यांच्या हाती सोपव ला पाहिजे. भारतीय राज्यघटना ही अशी राज्यघटना आहे ती दृष्टी प्रधान लोकांच्या हाती गेली तर देश योग्य दिशेने नेत्र दिपक अशी झेप घेईल आणि दृष्टिहीन लोकांच्या हाती गेली तर आंधाराकडे वाटचाल होईल हे भारतरत्न डॉ बाबासाहेबांचे विचार लक्षात ठेवून नागरिकांनी जागृत राहिले पाहिजे. सामाजिक धार्मिक परंपरा झुगारून डॉ.बाबासाहेबांनी महात्मा फुलेंचे विचार स्वीकारून महिलांना विशेष अधिकार व हक्क मिळवून दिला. राष्ट्रीय विकास म्हणजे केवळ अब्जावधी रुपयांच्या घोषणांचा व आश्वासनांचा पाऊस आणि विद्युत रोषणाई लखलखाट नव्हे तर स्वातंत्र्य समता आणि बंधुता या त्रिसूत्रीच्या बळावर आणि युवकांच्या हाताला काम कष्टाला दाम आणि सामाजिक न्याय मध्ये राष्ट्रीय विकास दडलेला आहे. भारताला महासत्ताक बनविण्यासाठी शाहू, फुले, आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार आत्मसात केले तरच भारताचे महासत्तेचे स्वप्न साकार होऊ शकते असे मत रोडे यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या विविध स्पर्धांचे पारितोषिकांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे आभार प्राचार्य डॉ. नामदेव यांनी मानले. सूत्रसंचालन प्रा.डॉ. अस्मिता साळवे व रोहन त्रिभुवन यांनी केले.यावेळी प्रा. डॉ. प्रज्ञा किवंडे प्रा. हर्षद वाघमारे प्रा. ज्योती मोरे प्रा. राजेंद्र भगत, प्रा.तुबा सय्यद,प्रा प्रवीण पावहारे प्रा. उत्कर्षा इंगोले श्रीमती भिमाबाई मुनेश्वर, संतोष प्रधान, पवन मस्के, कविता वावळे वंदना ढेंबरे यांच्या सह विद्यार्थी विद्यार्थिनी बहुसंख्य उपस्थित होते……………….
फोटो ओळ
भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त मॉडर्न महाविद्यालयात आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना प्रो.डॉ.कॅप्टन सुरेश गायकवाड, तुलशी शिक्षण समूहाचे प्रमुख प्रा. प्रदीप रोडे व्यासपीठावर प्राचार्य डॉ.नामदेव सानप. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करताना मान्यवर. मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक स्वीकारताना विद्यार्थिनी आणि ध्वजारोहण करताना मान्यवर.














