नांदेड रेल्वे विभागीय कार्यालय, दक्षिण मध्य रेल्वे, नांदेड येथे दिनांक 26 जानेवारी 2026 रोजी 77 वा गणतंत्र दिवस अत्यंत उत्साहात व देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री प्रदीप कामले, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, नांदेड यांनी सकाळी राष्ट्रीय ध्वज फडकावून कार्यक्रमाची सुरुवात केली.
यावेळी रेल्वे सुरक्षा बल (RPF) च्या जवानांनी शिस्तबद्ध व देखणी परेड सादर केली. या परेडचे निरीक्षण विभागीय रेल्वे व्यवस्थापक यांनी केले. कार्यक्रमास श्री राजेंद्र कुमार मीना, अप्पर विभागीय रेल्वे व्यवस्थापक, नांदेड, वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांसह दक्षिण मध्य रेल्वे महिला कल्याण संघटना (SCRWWO), नांदेडच्या अध्यक्षा सौ. प्रंधन्या कामले यांची उपस्थिती होती.
परेडनंतर आपल्या भाषणात श्री प्रदीप कामले यांनी गणतंत्र दिनाच्या शुभेच्छा देत नांदेड मंडलाच्या सर्वांगीण प्रगतीचा आढावा घेतला. त्यांनी सांगितले की गणतंत्र दिवस हा संविधान स्वीकारण्याचा दिवस असून तो आपल्या अधिकारांबरोबरच कर्तव्यांचीही जाणीव करून देतो. नांदेड मंडल आपल्या उत्कृष्ट कामगिरीसह सातत्यपूर्ण प्रगतीच्या मार्गावर अग्रसर आहे, असे त्यांनी ठामपणे नमूद केले.
सन 2025-26 या वर्षात नांदेड मंडलाने विविध क्षेत्रांत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. परिचालन विभागाने एक्सप्रेस गाड्यांसाठी 31 वेळा 100 % टक्के वेळपालन साध्य केले असून मागील वर्षाच्या तुलनेत ही मोठी सुधारणा आहे. नांदेड–मुंबई–नांदेड वंदे भारत एक्सप्रेसच्या विस्तारा सह एकूण 4 नवीन गाड्यांची सुरूवात करण्यात आली आहे.
वाणिज्य विभागाने तिकीट तपासणी मोहिमांद्वारे ₹14 कोटींहून अधिक महसूल मिळाला असून नांदेड मंडल दक्षिण मध्य रेल्वेमध्ये लक्ष्य ओलांडणारा एकमेव मंडल ठरला आहे. ATVM मशिनद्वारे एकूण तिकीट विक्रीपैकी सुमारे 60 टक्के तिकीट विक्री होत असून ही कामगिरी दक्षिण मध्य रेल्वेमध्ये सर्वाधिक आहे.
अभियांत्रिकी विभागाने परभणी–जालना, परळी–परभणी व पूर्णा–अकोला विभागांमध्ये सेक्शनल वेग 110 किमी प्रतितास करण्यात वाढ केली असून कायमस्वरूपी वेग निर्बंध हटवून प्रवासी व मालगाडी संचालन अधिक सुरक्षित व सुरळीत केले आहे. ट्रॅक देखभाल व डीप स्क्रिनिंग या कामांमुळे प्रवासाची गुणवत्ता अधिक सुधारली आहे.
याशिवाय विद्युत, सिग्नल व दूरसंचार, यांत्रिक, कार्मिक, सुरक्षा, भंडार व लेखा विभागांनीही उत्कृष्ट कार्य करत मंडलाच्या एकूण प्रगतीत मोलाचे योगदान दिले आहे.
यावेळी श्री प्रदीप कामले यांनी SCRWWO नांदेडच्या अध्यक्षा सौ. प्रंधन्या कामले यांच्या नेतृत्वाखाली महिला कल्याण संघटनेमार्फत राबविण्यात येणाऱ्या सामाजिक व कल्याणकारी उपक्रमांचे विशेष कौतुक केले. त्यांनी सांगितले की अधिकारी व कर्मचारी यांच्या समर्पणामुळेच नांदेड मंडल ही भरीव प्रगती साध्य करू शकले आहे.














