छत्रपती संभाजीनगर, दि.२७ : जगभरातील सर्वोत्कृष्ट चित्रपट मराठवाड्यातील रसिकांपर्यंत पोहोचवणार्या अकराव्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा उद्घाटन सोहळा बुधवार, दिनांक २८ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता रुक्मिणी सभागृहात मान्यवरांच्या प्रमुख संपन्न होणार आहे. या उद्घाटन सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ.किरण कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
यंदाचा पद्मपाणि पुरस्कार ज्येष्ठ भारतीय संगीतकार,पद्मविभूषण इलायाराजा यांना त्यांच्या भारतीय सिनेसृष्टीतील अतुलनीय योगदानाबद्दल प्रदान करण्यात येणार आहे.
यावेळी संयोजन समितीचे अध्यक्ष नंदकिशोर कागलीवाल व एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम, दिग्दर्शक आशुतोष कुलकर्णी, ऑस्कर विजेते ध्वनी संयोजन रसूल पुक्कूट्टी, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, एमजीएम विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.विलास सपकाळ, महोत्सव संचालक सुनील सुकथनकर, महोत्सवाचे कार्यकारी संचालक चंद्रकांत कुलकर्णी, प्रोझोनचे सेंटर डायरेक्टर व वरिष्ठ उपाध्यक्ष कमल आर. सोनी उपस्थित राहणार आहेत.
उद्घाटन सोहळ्यानंतर रात्री ९ वा. आयनॉक्स, प्रोझोन मॉल येथे यावर्षीची जागतिक पातळीवरील नावाजलेली व यावर्षीच्या ऑस्कर शर्यतीतील फ्रेंच आणि स्पॅनिश भाषेतील फिल्म सिरत ही फेस्टिव्हलची ओपनिंग फिल्म म्हणून प्रदर्शित केली जाणार आहे. उद्घाटन सोहळ्यानंतर पुढील चार दिवस दिनांक, १ फेब्रुवारी २०२६ पर्यंत चित्रपट महोत्सव आयनॉक्स, प्रोझोन मॉल येथे संपन्न होईल. प्रतिनिधी नोंदणी करण्यासाठी https://my.aifilmfest.in या संकेतस्थळावर नोंदणी करता येणार आहे.
छत्रपती संभाजीनगर येथील अभिनेत्री भाग्यश्री बोरसे हिचा दाक्षिणात्य चित्रपटातील कारकिर्दीसाठी विशेष सन्मान यावेळी करण्यात येणार आहे.
अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा उद्घाटन सोहळा सर्वांसाठी खुला असून रसिक प्रेक्षकांनी या सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.














