प्रतिनिधी / नांदेड, दि. 27 जानेवारी 2026: येत्या फेब्रुवारी महिन्यात सुरू होणाऱ्या पवित्र रमजान महिन्याच्या तसेच 19 फेब्रुवारी रोजी साजऱ्या होणाऱ्या शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर शहरात तातडीने नागरी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी नांदेड लोकन्याय विकास आघाडीने नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेकडे केली आहे. यासंदर्भात महापालिका आयुक्तांना लेखी निवेदन सादर करण्यात आले.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, रमजान काळात शहरातील सर्व प्रभागांमध्ये विशेष स्वच्छता मोहीम राबविणे, नियमित पाणीपुरवठा करणे, बंद पडलेले रस्ते दिवे तात्काळ सुरू करणे तसेच ज्या ठिकाणी लाईटची सुविधा नाही तेथे AMRC अंतर्गत नवीन एलईडी दिवे बसविणे आवश्यक आहे. तसेच बंद दिव्यांची दुरुस्ती करून पूर्ववत सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे.
रमजान महिन्यात मुस्लीम बांधव पहाटे सुमारे 2 वाजता सहेरीसाठी उठत असल्याने सकाळी व रात्री अशा दोन वेळा कचरा उचलण्याची व्यवस्था करावी. त्यासाठी प्रत्येक प्रभागात घंटागाड्यांची संख्या वाढविणे गरजेचे असल्याचे निवेदनात नमूद आहे.
सायंकाळी रोजा सोडण्यासाठी फळांची खरेदी मोठ्या प्रमाणात होत असल्याने नई आबादी, देगलूर नाका, निजाम कॉलनी, खडकपुरा, पिरबुरहान नगर, हट्टी मिट्टी का शेर, चौफाळा, मन्यार गल्ली, बरकी चौक, खुदवाईनगर चौक या भागांत फळांच्या गाड्यांची सुव्यवस्थित उभारणी करण्यासाठी नियोजन करावे, अशीही मागणी करण्यात आली आहे.
याशिवाय रमजान महिन्यात शहरात एक दिवसाआड नियमित पाणी सोडण्याची कार्यवाही करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. रमजान व शिवजयंती या दोन्ही निमित्तांनी शहरात कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी महापालिकेने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
हे निवेदन गटनेते प्रशांत इंगोले, माजी उपमहापौर अ. गफ्फर अ. सत्तार, तसेच विविध प्रभागांतील नगरसेवक व नगरसेविका — शेख अहमद उर्फ बाबुभाई खोकेवाले, मावीर चाऊस, शोएब हुसेन मजहर हुसेन, ओ. फहीम अ. मुनीर, मोहसीन खान, परवीन बेगम शेख पाशा, राहुल सोनसळे, सत्यपाल सावंत, हलीमा बेग शेख बाबु, राजश्री गोडबोले, आफिया खाजी नाफे, ज्योत्स्ना राजू गोडबोले, शेख उम्मे अयमन स. रिजवान, सुनिता जोंधळे आदींच्या स्वाक्षऱ्यांनी सादर करण्यात आले आहे.













