छत्रपती संभाजीनगर :- भारताची समृद्ध संस्कृती, स्वातंत्र्यसैनिक, फुले-झाडे, प्राणीजीवन, भारतीय इतिहास, कला-शिल्प, साहित्य, संगीत, खेळ, संत-महात्मे तसेच अवकाशयान संशोधन यांचा वारसा जतन करण्याचे कार्य डाक विभागामार्फत टपाल तिकिटांच्या माध्यमातून सातत्याने केले जाते. या टपाल तिकिटांबाबत शालेय विद्यार्थी व सर्वसामान्य नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी, या उद्देशाने जिल्हा, राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध टपाल तिकिट प्रदर्शनांचे आयोजन करण्यात येते.
याच उपक्रमाचा एक भाग म्हणून छत्रपती संभाजीनगर विभागातर्फे दुर्मिळ टपाल तिकिटांचे दोन दिवसीय भव्य प्रदर्शन (CSNPEX-2026) हे ३० व ३१ जानेवारी २०२६ रोजी टी. व्ही. सेंटर येथील कैलास शिल्प येथे आयोजित करण्यात आले आहे.
🔹 १० हजारांहून अधिक दुर्मिळ टपाल तिकिटांचे दर्शन
या प्रदर्शनात १८५४ सालापासून आजपर्यंतची सुमारे १० हजारांहून अधिक दुर्मिळ टपाल तिकिटे नागरिकांना पाहण्याची संधी मिळणार आहे. देशभरातील टपाल तिकिट संग्राहकांच्या संयुक्त विद्यमाने हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले असून, १०० पेक्षा अधिक टपाल तिकिट फ्रेम्स प्रदर्शनासाठी उपलब्ध असणार आहेत.
🔹 सर्व नागरिकांसाठी खुले प्रदर्शन
हे प्रदर्शन शालेय विद्यार्थी, महिला, कर्मचारी व सर्वसामान्य नागरिकांसाठी खुले असून टपाल खात्याच्या माध्यमातून एक अनोखा व ज्ञानवर्धक अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे. देशाच्या विविध भागांतून नामांकित टपाल तिकिट संग्राहक या प्रदर्शनासाठी उपस्थित राहणार आहेत.
🔹 विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा व आकर्षक बक्षिसे
प्रदर्शनादरम्यान १० वर्षांवरील विद्यार्थ्यांसाठी तसेच प्रौढांसाठी पत्रलेखन व प्रश्नमंजुषा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून, विजेत्यांना आकर्षक बक्षिसांचे वितरण करण्यात येणार आहे.
तसेच टपाल संग्राहकांचे विविध स्टॉल्स, दुर्मिळ फिलाटेली साहित्य, MY STAMP चे विक्री स्टॉल्स आणि डाक विभागाच्या विविध योजनांची माहिती देणारे स्टॉल्सही उपलब्ध असणार आहेत.
🔹 शाळा-महाविद्यालयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
आतापर्यंत १० ते २० शाळा व महाविद्यालयांनी सहभागासाठी संपर्क साधला असून त्यामध्ये केंद्रीय विद्यालय छत्रपती संभाजीनगर, पी. यू. जैन स्कूल, शारदा कन्या शाळा, ए. के. वाघमारे स्कूल, संत मीरा हायस्कूल, जिल्हा परिषद शाळा औरंगपुरा, धारेश्वर शिक्षण संस्था (गारखेडा) आदी शाळांचा समावेश आहे.
🔹 सहभागाचे आवाहन
हे प्रदर्शन छत्रपती संभाजीनगरच्या आग्रहास्तव विशेषतः आयोजित करण्यात आले असून शाळा, महाविद्यालये व नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
अधिकाधिक शाळा व महाविद्यालयांनी या प्रदर्शनात सहभाग नोंदवावा, असे आवाहन श्री. जी. हरीप्रसाद, प्रवर अधीक्षक डाकघर, छत्रपती संभाजीनगर विभाग यांनी समन्वय समितीच्या वतीने केले आहे.
















