मुंबई : मराठी भाषेचा पूर्वेतिहास अभिमान वाटावा इतका रोचक आहे. संपन्न आहे. वैभवपूर्ण आहे. भविष्यात मात्र मराठी भाषा महाराष्ट्रातून लोप पावेल की काय, अशी आजची अवस्था निर्माण झाली आहे. वैभवशाली मराठी भाषेचा पूर्वेतिहास पाहिल्यास इतकी का आपली भाषा समृद्ध होती असे आजच्या तरुण पिढीला वाटण्याची शक्यता आहे. मराठी शाळांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शिक्षण आणि व्यवहारातील हिंग्लिश मिंग्लिशच्या वाढत्या आक्रमणाला जबाबदार कोण? वैभवशाली मराठी भाषेला क्षीण करणारे दगाबाज कोण? (बाजारू शिक्षणव्यवस्था, पालकांची महत्वाकांक्षा की बदलत्या जगाचा व्यवहार ) या विषयावर मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबईच्या वतीने मराठी विचारधारा प्रतिष्ठान पुरस्कृत कामगार नेते वसंतराव होशिंग स्मृती लेख स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. शब्दमर्यादा १००० असून स्पर्धकांनी १५ फेब्रुवारी २०२६ पर्यंत chalval 1949@gmail.com यावर लेख पाठवावेत. देशपरदेशातील मराठी भाषाप्रेमी, साहित्यिक, राजकारणी, कलावंत, खेळाडू, स्पर्धा परीक्षार्थी, शिक्षक-प्राध्यापक-विद्यार्थी यांनी यात भाग घ्यावा. या स्पर्धेची शब्दमर्यादा दोन हजार असून पहिल्या तीन विजेत्यांना सन्मानचिन्ह, प्रशस्तिपत्र आणि रोख रक्कम तसेच इतरांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल, असे संघाचे अध्यक्ष रवींद्र मालुसरे यांनी घोषित केले आहे. स्पर्धेविषयी अधिक माहितीसाठी स्पर्धा प्रमुख सुनील कुवरे ९१६७३६४८७० यांच्याशी संपर्क साधावा. चळवळीचे ७६ वे वर्ष साजरे करताना संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धा गेली ५० वर्षे सातत्याने घेतली जात आहे. २७ फेब्रुवारी कवीश्रेष्ठ कुसुमाग्रज जन्मदिन आणि मराठी भाषा दिनाच्या कार्यक्रमात पारितोषिक वितरण कार्यक्रम होणार आहे. असे प्रमुख कार्यवाह प्रशांत घाडीगावकर यांनी सांगितले आहे.
















